इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पहिल्याच सामन्यामध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मुंबई इंडियन्सवर चार गडी आणि दहा चेंडू राखून विजय मिळवला. ललित यादवने ३८ चेंडूंमध्ये केलेल्या ४८ धावा आणि अक्षर पटेलने १७ चेंडूंमध्ये केलेल्या ३८ धावांच्या खेळीच्या जोरावर दिल्लीने हा विजय मिळवला. घरच्या मैदानावर खेळताना कर्णधार रोहित शर्मला पराभवाचं तोंड पहावं लागलं. मुंबईथील ब्रेबॉर्नवर झालेल्या लढतीमध्ये मुंबईने दिलेलं १७८ धावांचं आव्हान दिल्लीने १८.२ षटकांमध्ये पूर्ण केलं. मात्र पराभवाबरोबरच कर्णधार रोहितला १२ लाखांचा फटकाही या सामन्यामुळे बसलाय.
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांमध्ये ५ बाद १७७ अशी धावसंख्या उभारली. मुंबईचे सलामीवीर इशान किशन (४८ चेंडूंमध्ये ८१ धावा) आणि रोहित शर्मा (३२ चेंडूंमध्ये ४१ धावा) अशी दमदार सुरुवात करुन दिली. मात्र कुलदीप यादवने १८ धावांमध्ये तीन गड्यांना बाद करत मुंबईच्या धावसंख्येला लगाम लावला. दुसरीकडे धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर पृथ्वी शॉने २४ चेंडूंमध्ये केलेल्या ३८ धावांची खेळी वगळला आघाडीचे फलंदाज अपयशी ठरले. दिल्लीची स्थिती ६ बाद १०४ अशी होती. त्यावेळी मुंबई सामना सहज जिंकेल असं वाटत होतं. मात्र ललित आणि अक्षरने सातव्या गड्यासाठी ७५ धांवांची नाबाद फटकेबाजरी करत दिल्लीला विजय मिळवून दिला.
या सामन्यामध्ये षटकांची गती कायम न राखल्याबद्दल म्हणजेच स्लो ओव्हर रेटसाठी रोहित शर्माला दोषी ठरत त्याला १२ लाखांचा दंड करण्यात आलाय. अशापद्धतीची चूक रोहितकडून पहिल्यांदाच घडलीय. मात्र पहिल्याच सामन्यामध्ये असा दंड झाल्यामुळे या पुढील मालिकेमध्ये मुंबई इंडियन्सला अधिक सावध रहावं लागणार आहे. कारण पुन्हा एकदा अशी चूक केली तर दर चुकीसाठी दंडाची रक्कम वाढत जाणार आहे.
“मुंबई इंडियन्सला दंड ठोठावण्यात आलाय. त्यांनी टाटा इंडियन प्रिमियर लिग २०२२ च्या दिल्ली कॅपिटल्सविरोधात २७ मार्च रोजी ब्रेबॉर्नवर खेळवण्यात आलेल्या सामन्यामध्ये षटकांची गती कायम राखली नाही, म्हणून हा दंड करण्यात आलाय. किमान षटक मर्यादेच्या आयपीएलच्या नियमांनुसार ही संघाची पहिलीच चूक होती म्हणून मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मला १२ लाखांचा दंड करण्यात येतोय,” असं आयपीएलने जारी केलेल्या पत्रकात म्हटलंय.
आयपीएलसाठी बीसीसीआयने तयार केलेल्या नियमांनुसार २० षटकांचा सामना संपवण्यासाठी एका तासामध्ये किमान १४.१ षटकांची गोलंदाजी होणं गरजेचं आहे.