आग लावली जात असल्याचा मनपाचा संशय
पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल
कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवर आग लागल्याच्या घटना घडल्यानंतर ही आग लागते की लावली जाते असा संशय व्यक्त केला जात होता .या प्रकरणी कडोंमपा प्रशासनाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात सुडबुद्धीने आग लावली जात असल्याचा संशय व्यक्त करत तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे .
कल्याणच्या आधारवाडी डम्पिंगवर टाकला जाणारा ओला कचरा बंद करण्यात आला असला तरी सुका कचरा नेला जात आहे. हा सुका कचरा वर्गीकरण करण्याचे काम घेतलेल्या रेखा लाखे यांनी पालिकेची कोणतीही परवानगी न घेताच डम्पिंगवर शेड उभारण्याचे काम सुरू केले होते. मात्र याची माहिती मिळताच पालिका प्रशासनाकडून या शेडवर कारवाई करत ती तोडण्यात आली. यानंतर काही दिवसात या डम्पिंगवरील कचऱ्याला मोठी आग लागली असून या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पालिका प्रशासनाला दोन दिवस लागले. दरम्यान आग विझवल्यानंतर पालिका उपायुक्त कोकरे यांनी डम्पिंगवर आग लागू नये याकरिता पाणी मारण्याचे काम राहुल मजूर कामगार सहकारी संस्था मर्यादित या संस्थेला दिले होते .
या संस्थेमार्फत गुलाब जगताप पाणी मारण्याचे काम करतात. रेखा लाखे हि गुलाब जगताप यांची बहिण असून बहिणीची डम्पिंगवरील अनधिकृत शेड तोडल्याचा राग आल्यानेच जगताप यांनी डम्पिंगवरील कचऱ्याला आग लावल्याचा आरोप करत याप्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केडीएमसी उपायुक्त विजय कोकरे यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी गुलाब जगताप विरोधात पोलिसात रीतसर तक्रार केली आहे. तर याबाबत गुलाब जगताप यांनी पालिकेचे पत्र योग्य असून ही आग कोण लावतो याचा तपास पोलिसांनी करावा असे सांगत आपली बाजू मांडली.