दिवसेंदिवस राजकारणाचा स्थर खालावत चालला असताना लोकसभेत झालेल्या दोन मंत्र्यांच्या अभ्यासपूर्ण भाषण आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात नेत्यांबद्दल आदराची भावना व्यक्त केली असणार. केंद्रीय रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे मंत्री नितीन गडकरी आणि नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भाषणे ऐकणाऱ्या जनतेला नेते किती अभ्यासपूर्ण बोलू शकतात याचा सुखद प्रत्यय देणारी होती. लोकसभा म्हणजे निव्वळ गदारोळ आणि खासदारांचे असभ्य वर्तन हा दृढ होत चाललेला समज या दोन मंत्र्यांनी खोडून काढला. लोकशाहीची मंदिरे मानल्या जाणाऱ्या या सभागृहाची प्रतिष्ठा अशा आश्वासक भाषणांमुळे खचितच उजळून निघत असते.
विकासाच्या मुद्यावर मतदारांना मोहित करून सत्तेवर आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा ‘मॅस्कॉट’ असे गडकरींचे वर्णन केले तरी अतिशयोक्तीचे ठरू नये. देशातील दुर्गम भागांतही रस्त्यांचे जाळे विणणारे श्री. गडकरी अविश्रांत मेहनत करून विकासाच्या रक्तवाहिन्या सशक्त करीत आहेत. लेह- लडाख असो की हिमालयाच्या डोंगर राशितून रस्त्यांची निर्मिती असो, ही कामे अंदाजित खर्चापेक्षा कमी दरात आणि वेळेआधी पूर्ण करणे हे त्यांचे कौतुकास्पद वैशिष्ट्य. आपल्यावर टाकलेली जबाबदारी समर्थपणे पार करणाऱ्या गडकरींनी त्यांच्या मंत्रालयाचा लेखाजोखा घेतला. त्याबाबतचे निर्णय, आकडेवारी, विरोधकांच्या शंकांचे निरसन आणि तंत्रज्ञानाची अद्ययावत माहिती यांनी हे भाषण विश्वसनीय झाले. त्यात कुठेही शब्दच्छल नव्हता की अतिशयोक्ती. पारदर्शकता आणि प्रामाणिक तळमळ यांनी भारलेले हे भाषण येणाऱ्या नेतृत्वाला मार्गदर्शक ठरावे.
दुसरे प्रभावी भाषण होते नागरी हवाई उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे. एअर इंडियाचे टाटा समुहाकडे झालेले हस्तांतरण आणि त्यावर विरोधी पक्षाची विरोधी भूमिका यावरून ते घेरले जातील असे वाटले होते. पण झाले उलटेच. श्री.शिंदे यांनी खाजगीकरण आणि निर्गुंतवणुकीकरण यातील मूलभूत फरक सभागृहाला समजावून सांगत आधीच्याच सरकारने एअर इंडियाची कशी दैना उडवली हे आकडेवारीसह सिद्ध केले. जेव्हा लपवण्यासारखे काही नसते तेव्हा विचार सुस्पष्ट उमटतात. श्री. शिंदे यांचे भाषण ऐकताना ते प्रकर्षाने जाणवले. विमानतळांची नावे, व्यवस्थापन शास्त्रातील सूत्रे आणि सिद्धांत याचा उपयोग करीत त्यांनी भाषणाला वास्तवाची धार चढवली. वास्तविक पहाता दिवंगत मंत्री माधवराव शिंदे यांचा वारसा केवळ घराणेशाहीपुरता सीमित नाही हे ज्योतिरादित्य यांनी दाखवून एक आशावाद जागवला आहे. घराणेगिरीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला लावणारे हे भाषण होते.
लोकप्रतिनिधींकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी थोडासा अभ्यास, प्रामाणिक तळमळ आणि सकारात्मकता असेल तर राजकारणाची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ होण्यास मदत होईल.