बदलापुरात उडाला बैलगाडी शर्यतीचा धुरळा

बदलापूर: शिवजयंती निमित्त बदलापूर गाव शिवजयंती उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने पहिल्यांदाच एवढी मोठी राज्यस्तरीय बैलगाडा शर्यत आज बदलापूर गावाजवळील शेतात आयोजित करण्यात आली होती. उत्सव समिती अध्यक्ष कालिदास देशमुख यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण राज्यातील नावाजलेले बैलगाडा याठिकाणी स्पर्धेत सहभागी झाले. सकाळी 9 वाजल्यापासून या स्पर्धांना प्रारंभ झाला. तब्बल दीडशेहून अधिक शर्यती याठिकाणी घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी बदलापूर गावाजवळील शेतामध्ये मैदान देखील साकारण्यात आले होते. राज्यभरातील बैलगाड्या सोबतच मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या शर्यतीचा आनंद लुटण्यासाठी सहभागी झाले होते. प्रत्येक स्पर्धेमध्ये बैलगाड्यांवर बक्षिसांचा वर्षाव झाला. संपूर्ण बदलापूर गाव परिसरामध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती तर गावाच्या परिसरात गाड्यांच्या मोठा ताफा आल्या होत्या.

मैदानाच्या परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन आणि सर्व नियम पाळून बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान कोणताही अपघात होऊ नये याची आयोजकांनी पूर्ण काळजी घेतली होती. रणरणत्या उन्हात देखील या शर्यती पाहण्यासाठी शेकडोच्या संख्येने नागरिक एकवटले होते. अनेक मानाच्या स्पर्धा लाखोच्या घरात खेळविण्यात आल्या होत्या. सायंकाळी 6 वाजेपर्यंत या स्पर्धा सुरू ठेवण्यात आल्या. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त देखील स्पर्धेच्या ठिकाणी देण्यात आला होता.