दोन कामगारांचे प्राण वाचवण्यात यश
ठाणे : पाचपाखाडी भागातील हरिनिवास सर्कल येथील एका इमारतीच्या पाण्याची टाकी साफ करण्यास गेलेल्या दोन मजुरांचा मृत्यू झाला आहे तर दोन जणांना वाचविण्यात यश आले आहे.
हरिनिवास सर्कल येथे मराठा सेवा मंडळाची इमारत आहे. या इमारतीच्या टेरेसवर पाण्याची टाकी आहे. ही टाकी साफ करण्याचे काम मे. स्वराज इंटरप्राइजेस या कंपनीचा ठेकेदार निलेश ताम्हाणे याला मंडळाने दिले होते. आज सकाळी ११ वाजता इंदिरा नगर येथे राहणारे योगेश नरवणकर (३९), गणेश नरवणकर (३८), विवेक कुमार (३०) आणि मिथुन ओझा (३०) हे चार कामगार ही टाकी साफ करण्यासाठी आले होते. त्यांनी तिन्ही टाकीतील पाणी काढून टाक्या स्वच्छ करण्यासाठी त्यामध्ये एस.पी. आर. २ नावाचे रसायन टाकले. योगेश आणि विवेक हे दोघे टाक्या साफ करण्यास उतरले असता काही वेळाने ते दोघे जोरजोरात ओरडायला लागले. त्यांना वाचविण्यासाठी गणेश आणि मिथुन हे दोघे टाकी उतरले, परंतु त्यांना देखील त्रास होऊन सर्व कामगार टाकीत बेशुद्ध पडले.
याबाबत नौपाडा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती देण्यात आली होती. ते घटनास्थळी पोहोचले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी दोरीच्या मदतीने बेशुद्ध पडलेल्या चार कामगारांना बाहेर काढले. त्यापैकी योगेश नरवणकर आणि विवेक कुमार या दोघांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. गणेश आणि मिथुन यांना चरई येथील संपदा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांची प्रकृती चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या कामगारांना बाहेर काढताना आपत्ती व्यवस्थापन पथकाला अनेक अडचणी आल्या. पाण्याच्या टाकीवर मोबाईल टॉवर उभारण्यात आला होता, त्यामुळे बचावकार्य करताना आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांना कसरत करावी लागली. तीन पाण्याच्या टाक्यांपैकी एका टाकीवर मोबाइल टॉवर होता. त्याची उंची कमी असल्याने कामगारांना बाहेर पडता आले नाही तसेच बेशुद्ध पडलेल्या कामगारांना देखील वाचविण्यासाठी कसरत करावी लागली, असे नौपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. धुमाळ यांनी सांगितले.
ठेकेदाराने कुठल्याही प्रकारची कामगाराच्या सुरक्षेची काळजी घेतली नाही टाकी मध्ये शिडी ठेवणे आवश्यक होते तसेच दोरखंड देखील पाहिजे होता परंतु अशी कोणत्याही प्रकारची साधने ठेवण्यात आली नव्हती या दुर्घटनेलाठेकेदार जबाबदार असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे श्री धुमाळ म्हणाले