ठाणे : येथील निळकंठ वुड्समधील ओलिविया या इमारतीच्या १९ व्या मजल्यावरुन स्वत:ला झोकून देत ओम मनिष मिश्रा (१५) या दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.
रेनबो इंटरनॅशनल शाळेत शिकणाऱ्या ओम याची सध्या शालांत परीक्षा सुरू होती. तो २६ मार्च रोजी विज्ञानाचा पेपर देऊन घरी परतला. काही वेळाने त्याला वडिलांनी अभ्यास कर असे सांगितले. या रागातून त्याने आई वडीलांसमोरच थेट १९ व्या मजल्यावरुन उडी घेऊन आत्महत्या केली. खाली कोसळल्यानंतर त्याच्या पायाला आणि डोक्याला मार लागून तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने जवळच्याच टायटन या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी चौकशी करण्यात येत आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुलभा पाटील यांनी सांगितले.