असे ‘पुतीन’ पुष्कळ !

साध्या राहणीमानाची राजकारण्यांना ॲलर्जी असावी असे वाटते. नाही म्हणायला या निरीक्षणास अपवाद जरूर आहेत. परंतु बहुसंख्य नेते छान कपडे, महागड्या गाड्या, आलिशान निवासस्थाने एखाद्या राजा वा महाराणीला लाजवतील असे शौक ठेवणे, मिळेल तिथे संपत्तीची उधळण करून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करणे नेत्यांना आवडत असते. या खोट्या बडेजावाला केवळ भारतीय नेतेच बळी पडतात असे नव्हे तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन हेही उच्च राहणीमानासाठी प्रसिद्ध आहेत. सध्या युक्रेनवर हल्ला करून अवघ्या जगाच्या रोषास कारणीभूत ठरलेल्या पुतीन यांच्या आक्रमकपणामागे त्यांची डोळे दिपवणारी श्रीमंती आणि तिची आस तर नसेल ? 
 
फॉर्च्युन मासिकानुसार, पुतीन यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मिळणारा पगार १,४०,००० डॉलर्स आहे. त्यांच्याकडे दोनशे अब्ज डॉलर्सची संपत्ती आहे. त्यात १५ बंगले, ७०० महागड्या गाड्या, ५८ विमाने आणि हेलिकॉप्टर्स आदी गोष्टींचा समावेश आहे. ते ज्या ब्लॅक सी मेन्शनमध्ये रहातात त्याचे क्षेत्रफळ १,९०,००० चौ. फूट आहे. आत संगमरवरी स्विमिंग पूल आहे. प्रशस्त बार रूम असून त्यात हजारो डॉलर्सचे मद्य कायम भरलेले असते. त्यांच्या हातातल्या घड्याळाची किंमत पाच लक्ष डॉलर्स इतकी आहे. युक्रेनविरुद्ध युद्धाला तत्वाचा मुलामा दिला जात असला तरी अशा श्रीमंतीची नशा असणाऱ्या नेत्याच्या मनातील राक्षसी महत्वाकांक्षा त्यास कारणीभूत असू शकते. केजीबी या रशियन गुप्तहेर संघटनेचे प्रमुख हेर म्हणून राहिलेल्या पुतीन यांच्या मनात राजकारणाची वेगळी व्याख्या असावी. सर्वश्रेष्ठ, जगज्जेते आणि आव्हान देण्यास कोणीही धजावणार नाही असे निर्विवाद नेतृत्व पुतीन यांनी तयार केले. त्यासाठी त्यांनी राष्ट्राध्यक्ष राहण्याची व्यवस्था केली. एकदा का सर्वेसर्वा झाले की देशांतर्गत आपल्याच मर्जीने कारभार हाकता येईल आणि कोणी आव्हान देण्याचा प्रश्नही उपस्थित रहाणार नाही. बाकी डावी विचारसरणी, कम्युनिझम वगैरे आलिशान महालात कुठेतरी अडगळीत पडले असणार. युक्रेनविरुद्ध युद्ध पुकारून त्यांनी पुरुषार्थ गाजवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांचे लक्ष विचलित करून श्रीमंतीत लोळत राहण्याचे पुतीन यांचे स्वप्न दिसते. त्यासाठी मात्र त्यांनी जगाची झोप उडवली आहे. 
 
गेल्या काही वर्षांत भारतीय राजकारण्यांच्या संपत्तीबाबतच्या सुरस कथा आपण ऐकत आहोत. भ्रष्टाचार हा अविभाज्य भाग बनला आहे. म्हणून भारतीयांना कमीपणा वाटत असे. आता पुतिनची श्रीमंती पाहिल्यावर आपले नेते दारिद्रय रेषेखालचे वाटू लागतील. आपण ठरवले तर साधेपणा पुन्हा राजकारणात आणू शकतो परंतु जनतेलाही हाताच्या बोटात चार-चार अंगठ्या, गळ्यात जाडजूड सोन्याची चेन, नेत्याची किमान दोन-पाच कोटींची गाडी पहाण्याची सवय झाली आहे. हे काही नसले त्यांना नेतेच न मानण्याची मानसिकता वाढू लागली आहे.