आधी रामाच्या नावाने, आता दाऊदच्या नावाने मते मागणार का?

मुख्यमंत्र्यांचा भाजपला टोला

मुंबई: दाऊद कुठे आहे हे कुणालाच माहिती नाही. आधी यांनी रामाच्या नावावर मतं मागितली आता दाऊदच्या नावाने मतं मागणार का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे. ते आज विधीमंडळात बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, नवाब मलिक हा दाऊदचा माणूस आहे असा त्यांच्यावर आरोप केला जातोय. मग ते पाच वेळा निवडून येतात, मंत्री होतात, तरीही केंद्राच्या यंत्रणांना समजले कसे नाही. त्यांना आता समजतंय की तो दाऊदचा माणूस आहे. केंद्राच्या यंत्रणा मग करतात काय? नुसत्या थाळ्या वाजवायच्या, दिवे पेटवायचे काम करतात का?, असा खोचक प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, “देवेंद्रजी तुम्ही रॉ, ईडी, सीबीआयमध्ये जायला हवेत, तुम्ही ईडीला नवाब मलिकांची माहिती दिली. मग त्यांना जाग आली. तुम्हीच जर त्या ठिकाणी गेलात तर त्यांचं काम वेगाने होईल. ही ईडी आहे की घरगडी आहे तेच समजत नाही. ओबामाने ओसामाच्या नावाने मतं मागितली होती का? निवडणुकीत त्याचा वापर केला होता का? ओबामांनी ओसामाला त्याच्या घरात घुसून मारलं हा मर्दपणा. जा घुसा आणि त्या दाऊदला मारा, याला म्हणतात मर्दपणा, अशा शब्दांत त्यांनी भाजपचा खरपूस समाचारही घेतला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, “आज तुम्ही नवाब मलिकांचा राजीनामा मागताय. पण अफजल गुरूला फाशी देण्याची वेळ आली त्यावेळी मेहबुबा मुफ्ती यांनी फाशी देऊ नका असं त्या म्हणाल्या होत्या. मग त्या मुफ्तीसोबत सत्तेत भाजप बसले. बुऱ्हान वाणीला मारल्यानंतर त्या घरी गेल्या होत्या. अशा लोकांसोबत तुम्ही सत्तेचा सारीपाट मांडला होता. तुमचा सकाळचा सत्तेचा प्रयोग यशस्वी झाला असता तर देशमुख आणि मलिक तुम्हाला चालले असते का? असा थेट सवालही त्यांनी केला.

तुम्ही म्हणजे मुंबई, महाराष्ट्र नाही 

देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई: तुम्ही म्हणजे मुंबई नाही, तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला आहे. आपण मागितलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं नाही असं म्हणत विरोधकांनी सभात्याग केला.

महाराष्ट्रावर टीका केली तर ती सहन केली जाणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही आणि तुम्ही म्हणजे मराठी नाही. हा गैरसमज तुमच्या मनातून आधी दूर करा, अशी टीकाही त्यांनी केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “इतरांचं ठिक आहे, पण नवाब मलिकांचे समर्थन मुख्यमंत्र्यांनी करणे हे मनाला लागलंय, मुख्यमंत्री ठाकरे नवाब मलिकांचे समर्थन कसं काय करु शकतात असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. त्यावर उत्तर देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “आपण विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही. त्यांचं भाषण हे विधीमंडळातील नसून शिवाजी पार्कवरचं आहे असंच वाटत होतं. नवाब मलिकांनी 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपीकडून जमीन खरेदी केली होती. मग त्यांचं समर्थन कसं काय करणार?”

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युक्रेनने नाटोऐवजी मुख्यमंत्र्यांची मदत मागायला हवी होती. त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्र्याकडे एक वेगळं शस्त्र आहे. ते म्हणजे ‘टोमणा’ बॉम्ब.
सत्तेसाठी तुम्ही कोणत्या शकुनीसोबत गेला आहात असा सवाल करताना कपटांनी राज्य हे कौरवांनी घेतलं होतं, पांडवांनी नाही असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.