आयपीएल दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर ? मैदाने, हॉटेल्सची केली रेकी, सुरक्षा यंत्रणा अलर्टवर !

आयपीएल क्रिकेटचा पंधरावा हंगाम दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. येत्या २६ मार्चपासून आयपीएलच्या सामन्यांना सुरुवात होणार असून तब्बल दोन महिने ही स्पर्धा चालणार आहे. दरम्यान, खेळाडू तसेच इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा गंभीर मुद्दा आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार दहशतवाद विरोधी पथकाने काही दहशतवाद्यांना अटक केलं आहे. या दहशतवाद्यांनी आयपीएल सामने खेळवले जाणारी मैदाने, खेळाडू थांबलेले हॉटेल्स, तसेच मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गाची रेकी केली होती.

दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसने काही दहशतवाद्यांना अटक केलं आहे. या दहशतवाद्यांची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांनी आयपीएलचे सामने ज्या ठिकाणी खेळवले जाणार आहेत, त्या मैदानांची पाहणी केली होती. तसेच त्यांनी खेळाडू ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते हॉटेल्स तसेच हॉटेल आणि मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गाचीही रेकी केलेली आहे. त्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला आहे. खबरदारी म्हणून स्पर्धेदरम्यान, सामना होणारे मैदान, खेळाडू ज्या ठिकाणी थांबलेले आहेत ते हॉटेल्स त्याचबरोबर मैदानापर्यंत जाण्याच्या मार्गावरील सुरक्षा कडक करण्यात येणार आहे. आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईतील वानखेडे आणि ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार संभाव्य धोका लक्षात घेता, खेळाडूंची विशेष काळजी घेतली जाणार आहे. मैदानावर जाण्यासाठी खेळाडूंना त्यांच्या बससोबत स्पेशल एस्कॉर्ट दिले जाणार आहे. तसेच हॉटेल्समध्येही खेळाडूंना विशेष सुरक्षा पुरविली जाणार आहे. पंच तसेच इतर अधिकाऱ्यांनाही ही सुरक्षा दिली जाणार आहे. सामना सुरु असताना खेळाडू थांबलेले हॉटेल्स तसेच मैदानाकडे जाण्याच्या मार्गावर गाड्या पार्क करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.

तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २६ मार्च ते २२ मे या कालावधित शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक पथक तसेच राज्य राखीव पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

दरम्यान, आयपीएलचे बहुतांश सामने मुंबईमध्ये होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २०, ब्रेबॉर्न स्टेडियमवर १५, नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर २० आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत.