राज्यातील ९३ टक्के आमदार कोट्याधीश, तरी त्यांना मिळणार कोट्यावधींची घरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधान सभेत गुरुवारी मोठी घोषणा केली. राज्यातील ३०० आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळणार आहे. आता राज्यातील आमदारांपैकी ९३ टक्के आमदारांची संपत्ती कोट्यवधीत आहे.

या कोट्याधीश आमदारांना राज्य सरकार पुन्हा कोट्यवधीची घरे मुंबईतील गोरेगावात देणार आहे. गोरेगावमधील जमीन म्हाडाच्या ताब्यात आहे. यापुर्वीच आमदारांना लाखो रुपये पगारासह इतर अनेक सवलती मिळतात.

मुंबईतील गोरेगाव येथे आमदारांसाठी ३०० एचआयजीची घरे बांधण्यात येतील. एमएमआर रिजनमधील (मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई येथील) आमदारांना वगळून इतर आमदारांना ही घरे दिली जाणार आहे. ही घरे सगळ्याच पक्षाच्या आमदारांना देण्यात येणार आहे. मुंबईबाहेरील आमदारांना मुंबईत घरे मिळत नसल्याच्या व त्यांना भाडेही परवडत नसल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा राज्य सरकारने केला.

हे आमदार ठरतील पात्र
राज्यात विधानसभेतील २८८ व विधान परिषदेचे ७८ असे एकूण ३६६ आमदार आहेत. त्यापैकी मुंबई, ठाणे व नवी मुंबई येथील आमदारांची संख्या ५४ ते ६० च्या घरात जाते. या आमदारांना वगळून इतर ३०० आमदारांना गोरेगावातील कायमस्वरूपी घर देण्यात येणार आहे.

राज्यात २६४ (९३%) आमदार कोट्यधीश
२०१९ विधानसभा निवडणुकीत एडीआर संस्थेने उमेदवारांचा अहवाल प्रकाशित केला होता. त्यानुसार, २८८ पैकी ९३% म्हणजे तब्बल २६४ आमदार कोट्यधीश आहेत. सर्वाधिक श्रीमंत आमदारांत भाजपचा वरचा क्रमांक असून ९५% म्हणजे १०५ पैकी १०० आमदार कोट्यधीश आहेत. त्यानंतर शिवसेनेचे ९३% म्हणजे ५५ पैकी ५१ आमदार कोट्यधीश आहेत. राष्ट्रवादीच्या ५४ पैकी ४७ म्हणजे ८९% तर काँग्रेसचे ४४ पैकी ४२ म्हणजे ९६% आमदार कोट्यधीश आहेत.

अशी आहे आमदारांची संपत्ती
5 कोटी + : 180 आमदार 63.2%
2 ते 5 काेटी : 65 आमदार 22.7%
50 लाख ते 2 कोटी : 34 आमदार 11.9%
10 ते 50 लाख : 05 आमदार 1.8%
10 लाख + : 01 आमदार
पक्षनिहाय आमदारांची सरासरी मालमत्ता
27.46 कोटी : भाजप
13.74 कोटी : शिवसेना
15.01 कोटी : राष्ट्रवादी
24.46 कोटी : काँग्रेस

एका फ्लॅटची किंमत दीड ते दोन कोटी
गोरेगावात उच्च उत्पन्न गटाअंतर्गत म्हाडाचे १००० ते १२०० चौरस फूट क्षेत्रफळाचे २ बीएचके फ्लॅट्स आमदारांना मिळतील. येथे सुमारे १८ ते २० हजार रुपये प्रतिचौरस फूट दर आहे. म्हणजेच एका फ्लॅटची किंमत साधारण दीड ते दोन कोटी रुपयांच्या घरात जाते.

आमदारांना काय आहेत सुविधा
मासिक वेतन – 2 लाख 40,973
महागाई भत्ता – 30 हजार 974
फोन बिल – 8 हजार
टपाल खर्च : 10 हजार
ड्रायव्हरचा पगार – 15 वरून 20 हजार
पीएंचा पगार – 25 वरून 30 हजार
संगणक चालकाचा पगार – 10 हजार
अधिवेशनकाळात व समित्यांच्या बैठकांना दैनिक भत्ता : २ हजार
आमदाराचे तहहयात निवृत्तिवेतन – 50 हजार रुपये महिना
निधनानंतर आमदार पत्नीस – 40 हजार रुपये महिना
रेल्वेचा प्रवास राज्यात मोफत, बाहेर ३० किमीपर्यंत
विमान प्रवास राज्यात ३० वेळा एकेरी मोफत, बाहेर ८ वेळा एकेरी
१० लाखांपर्यंतच्या वाहन कर्जावर १० % व्याजाचा परतावा
​​​​​​​खासगी वैद्यकीय उपचारांचा ९० % खर्च