ठाणे : वाहनतळाची सोय नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा मिळेल त्या जागी वाहने उभी केल्याने स्टेशन आणि गावदेवी परिसरात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. महिन्याभरात गावदेवी येथीलभूमीगत वाहनतळ खुले होणार असल्याने वाहतूक कोंडीतून या परिसराची सुटका होणार आहे.
ठाणे स्मार्ट सिटी लि.अंतर्गत गावदेवी मैदानात उभारण्यात येणाऱ्या भूमिगत वाहनतळाचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहनतळ सुविधा लवकरच नागरिकांसाठी खुली होणार असल्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आज नमूद केले. यावेळी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, कार्यकारी अभियंता विकास ढोले, मोहन कलाल, विनोद पवार, वरिष्ठ उद्यान अधिक्षक केदार पाटील आदी अधिकारी उपस्थित होते.
ठाणे रेल्वे स्थानक, गावदेवी परिसरात नागरिक रस्त्याच्या कडेला दुचाकी वा चारचाकी वाहने उभी करतात. त्यामुळे या परिसरातील वाहतुकीला अडथळा होऊन सातत्याने कोंडी होत असते. ही समस्या सोडवण्यासाठी ठाणे महापालिकेच्यावतीने ठाणे स्मार्ट सिटी लि. अंतर्गत गावदेवी मैदानात भूमिगत वाहनतळ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
सद्यस्थितीत हे काम प्रगतीपथावर असून आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संपूर्ण प्रकल्पाची पाहणी करून सविस्तर आढावा घेतला. गावदेवी वाहनतळ हे ४ हजार ३३० चौरस मीटरचे असून त्यामध्ये १३० चारचाकी वाहने तर १२० दुचाकी वाहने उभी करण्याची सुविधा निर्माण होणार आहे. या वाहनतळमध्ये कार लिफ्ट, विद्युत तसेच इतर किरकोळ कामे अंतिम टप्प्यात असून येत्या महिनाभरात हे काम पूर्ण होऊन वाहनतळ नागरिकांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक डॉ. विपीन शर्मा यांनी यावेळी सांगितले.