ठाण्यात पदाधिकाऱ्याच्या धमक्यांमुळे शिवसेना शाखाप्रमुख गायब

आमदार निरंजन डावखरे यांनी वेधले विधान परिषदेचे लक्ष

ठाणे : ठाणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली असून, शिवसेना पदाधिकाऱ्याकडून सातत्याने येणाऱ्या धमक्यांमुळे शिवसेनेचा एक शाखाप्रमुख घर सोडून निघून गेला आहे. या गंभीर प्रकाराकडे भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी सोमवारी लक्ष वेधून शाखाप्रमुखाचा शोध घेण्याचे राज्य सरकारला निर्देश देण्याची सभापतींकडे विनंती केली.

ठाणे शहरासह जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. ठाण्यातील शिवसैनिक मनोज नारकर यांना शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याकडून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्याचे मित्र व नातेवाईकांना त्रास दिला जात आहे. या प्रकाराला कंटाळून मनोज नारकर हे निघून गेले. त्यांनी घर सोडताना लिहिलेल्या चिठ्ठीत त्या पदाधिकाऱ्याचा उल्लेख केला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी केवळ व्यक्ती हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. ठाण्यात शिवसेनेचेच पालकमंत्री असताना एखादा शाखाप्रमुख असुरक्षित असेल, तर कायदा व सुव्यवस्था कुठे पोचली आहे, हे दिसत आहे, याकडे आमदार निरंजन डावखरे यांनी लक्ष वेधले. तसेच मनोज नारकर यांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेण्याची विनंती केली.