ऑल इंग्लंड ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2022 च्या अंतिम फेरीत भारताचा शटलर लक्ष्य सेन रविवारी इतिहास रचण्यापासून मुकला. भारताचा युवा बॅडिमटनपटू लक्ष्य सेनला ऑल इंग्लंड खुल्या बॅडिमटन स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डेन्मार्कच्या व्हिक्टर अॅक्सेलसेनकडून २१-१०, २१-१५ असे सरळ सेटमध्ये पराभूत होऊन उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. लक्ष्य या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला; पण त्याचे ही स्पर्धा जिंकणारा तिसरा भारतीय खेळाडू ठरण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. यामुळे लक्ष्य सेन याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर या पराभवानंतर लक्ष्य सेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सचिन तेंडुलकर यांनी प्रोत्साहन दिले.
पंतप्रधान मोदींनी म्हटले की, “लक्ष्य सेन, तुमचा अभिमान आहे, तुम्ही उल्लेखनीय संयम आणि दृढता दाखवली आहे. तुम्ही उत्साही लढा दिला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मला विश्वास आहे की तुम्ही यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करत राहाल.” तर सचिन तेंडुलकरने ट्विट केले आहे की, “आयुष्यात कोणतेही अपयश नसते. तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकतात. मला खात्री आहे की लक्ष्य सेन या अद्भुत अनुभवातून तुम्ही खूप काही शिकला आहात. आगामी स्पर्धांसाठी तुम्हाला शुभेच्छा.”
पंतप्रधान मोदी आणि सचिन तेंडुलकर यांचे हे शब्द या २० वर्षीय खेळाडूचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारे ठरतील. तर, स्पर्धेबद्दल बोलायचे झाले तर डेन्मार्कच्या जागतिक नंबर १ खेळाडूने लक्ष्य सेनचा ५३ मिनिटांत पराभव केला. या पराभवामुळे लक्ष्य सेन १९८० मध्ये प्रकाश पादुकोण आणि २००१ मध्ये पुलेला गोपीचंद यांच्यानंतरचा तिसरा भारतीय चॅम्पियन होण्यापासून मुकला. या विजयासह एक्सलसन याने लक्ष्याविरुद्धचा आपला कारकिर्दीचा विक्रम ५-१ वर नेला आहे.
ऑल इंग्लंड स्पर्धेचे उपविजेतेपद मिळवणारा लक्ष्य हा तिसरा भारतीय बॅडिमटनपटू ठरला आहे. त्याच्याआधी प्रकाश नाथ (१९४७) आणि सायना नेहवाल (२०१५) यांनी ही दमदार कामगिरी केली होती. तसेच दोन भारतीय खेळाडूंनी ही स्पर्धा जिंकली आहे.