ठाणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहली येत्या सोमवारी ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सरावासाठी दाखल होण्याची शक्यता आहे.
इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या पंधराव्या सिझनची सुरवात २६ मार्चपासून होणार आहे. या सामन्यांआधी सरावाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे खेळाडू आज दादोजी कोंडदेव स्टेडियमवर हजर होते. यामध्ये भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंसह इतर संघातील खेळाडूंनीही सराव केला.
आयपीएल पूर्व तयारीचे हे सरावसत्र आजपासून ठाण्यात सुरु झाले. ३१ मार्चपर्यंत हे पहिले सत्र चालणार आहे. यानंतर एप्रिल महिन्यात पाच दिवस तर मे महिन्यात दोन दिवस ठाण्यात सराव होईल. यानिमित्ताने आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे डेव्हिड विली, दिनेश कार्तिक, रदरफोर्ड, फिन अॅलन या खेळाडूंनी सराव केला. सोमवारी विराट कोहली, हर्षल पटेल या भारतीय खेळाडूंसह दक्षिण आफ्रिकेचा फाफ ड्युप्लेसी दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सरावासाठी हजेरी लावणार आहेत.
मुंबईच्या वांद्रे येथील ताज लँड एन्ड या हॉटेलमध्ये वास्तव्यास असलेले हे सर्व खेळाडू व्होल्वो बसमधून ठाण्यात दाखल झाले. त्यांच्या ग्रीन कॉरिडॉरच्या ताफ्यात ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील हजर होते. त्यांच्या देखरेखीखाली खेळाडूंना सुखरूपपणे दादोजी कोंडदेव स्टेडियमवर आणण्यात आले.