ठाणे : विराट कोहली याच्या रॉयल चॅलेंज बेंगलोर (आरसीबी) या आयपीएल संघाचे क्रिकेटपटू १७ मार्चपासून ठाण्याच्या दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये सराव करणार असल्याने ठाण्याला नवीन ओळख मिळणार आहे. त्यांच्यासाठी ठाणे पोलीस ग्रीन कॉरिडॉर करणार आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या सामन्याला २६ मार्चपासून सुरुवात होणार आहे. १७ ते १ एप्रिल दरम्यान दुपारी २ ते संध्याकाळी ६ च्या दरम्यान हे खेळाडू सराव करणार आहेत. या संघात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत, त्यामुळे मुंबईतून ठाण्यात आल्यानंतर त्यांच्याकरिता ग्रीन कॉरिडॉर करण्यात येणार आहे. त्या मार्गाची आज वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे, क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी पाहणी केली. आनंदनगर चेक नाका, कॅडबरी सर्कलपासून आंबेडकर रोडमार्गे सिव्हिल हॉस्पिटल समोरून जेल तलाव पोलीस आयुक्त कार्यालय येथून दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे तीन इनोव्हा कार आणि तीन व्हॉल्वो बसने हे खेळाडू येणार आहेत. त्यांना विना अडथळा पोहचता यावे यासाठी हे ग्रीन कॉरिडॉर करण्यात येणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सांगितले. या पूर्वी कोलकत्ता नाईट रायडर्सच्या खेळाडूंनी येथे सराव केला होता. त्यांची मुदत संपल्याने आत्ता आरसीबीला सराव करण्यास परवानगी देण्यात आली असल्याचे क्रीडा अधिकारी मिनल पालांडे यांनी सांगितले.
स्टेडियमसमोर त्यांच्या बसला वळसा घेण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने या परिसरात रस्त्यावर पार्किंग करण्यात आलेली वाहने हटवण्यात यावीत, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त श्री. पाटील यांनी केले आहे.