ठाणे : गेल्या तीन दिवसांत तापमानात कमालीची वाढ झाली असून मार्चच्या पहिल्या तारखेलाच तापमानाने ४० अंशाचा पारा गाठला. काल १४ मार्चला सर्वाधिक ४३ तर आज १५ मार्चला सर्वाधिक ४३.३ अंश तापमानाची नोंद झाली. मे महिन्यात जाणवणारा उकाडा मार्चच्या सुरुवातीपासूनच जाणवू लागल्याने ठाणेकर घामाघूम होत आहेत.
होळी पेटली की ग्रीष्म ऋतूला सुरुवात होते असा आजवरचा अनुभव आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून बदललेल्या हवामानाचे वेळापत्रक आणि चार दिवसांपासून ग्लोबल वॉर्मिंगच्या चटक्यामुळे अचानक तापमानात वाढ झाली आहे. त्याचा फटका ठाण्यालाही बसला आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये २८ फेब्रुवारीला कमाल ३९ अंश तापमानाची नोंद झाली. १ मार्चला ४० तर २ मार्चला चक्क ४१ अंश तापमानाची नोंद झाली होती. मे महिन्याच्या पंधरवड्यात ठाण्यात ४० अंश तापमानाची नोंद होते. मात्र यंदा मार्चच्या सुरुवातीलाच पारा ४१ वर पोहचलेले तापमान १५ मार्चला ४३.३च्या पुढे गेल्याने येणारा उन्हाळा किती तापदायक असेल या चिंतेने ठाणेकर आणखी घामाघूम झाले आहेत.
आज सकाळी पासूनच कडाक्याचे उन पडले होते उन्हाचा तडाखा दुपारी जास्त जाणवत होता संध्याकाळी हा उष्मा कायम होता. मुख्य बाजारपेठेतील रस्ते नेहमी गजबजून गेलेले असतात, परंतु आज मात्र या रस्त्यावर शुकशुकाट पाहण्यास मिळाला. उसाचा रस आणि थंड सरबत पिण्यासाठी ठाणेकरांनी गर्दी केली होती.