ठाणे: वॉर अगेन्स्ट टँकर माफिया ही चळवळ सुरू झाली असून नुकतीच पाण्यासाठी दरमहा लाखो रुपये मोजणाऱ्या गृहसंकुलातील प्रतिनिधींची परिषद संयोजक दत्ता
घाडगे यांच्यातर्फे आमदार संजय केळकर यांच्या उपस्थितीत झाली.
आ. संजय केळकर यांनी पाण्यासाठी हतबल न होता लढण्यासाठी तयार व्हा सांगून आता नुसती निवेदने न देता जनशक्ती दाखवण्याची वेळ आली असून याबाबत ऍक्शन प्लॅन जाहीर केला. सत्ताधारी शिवसेनेने ३० वर्षे ठाणेकरांना पाण्यासाठी सुद्धा कशी खोटी आश्वासनं देऊन फसवलं याची माहिती दिली. त्याचबरोबर २०१६ पासून कोर्टातील पीटिशनचीसुद्धा माहिती दिली. कोर्टाला सादर केलेले अफिडेव्हिट महापालिकेने प्रत्यक्षात अमलात आणले नाही, कोर्टाची दिशाभूल केली. कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता नवीन बांधकामांना परवानगी देणेबाबत कोर्टाची मान्यता घेतली. पाणी व्यवस्था होत नाही तोपर्यंत नवीन बांधकामाला परवानगी देऊ नये. टँकरमुक्ती झाली नाही तर मालमत्ता कर निषेध म्हणून भरणार नाही, नो वॉटर नो टॅक्स अशी भूमिका घेऊ असेही संजय केळकर यांनी सांगितले.
२५ गृहसंकुलातील प्रतिनिधींनी प्रत्यक्ष संवाद केला आणि समस्या परिषदेत सांगितल्या. याप्रसंगी मनोहर डुंबरे, राम ठाकूर, विकास पाटील, मत्स्यगंधा पवार, कैलास म्हात्रे, रवी रेड्डी आदी उपस्थित होते.