नवी मुंबई महापालिकेने पूर्ण केले १०० टक्के लसीकरण

ठाणे : नवी मुंबई महापालिकेने 18 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीच्या दोन्ही डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण केले असून ते राज्यातील प्रथम क्रमांकाचे शहर
ठरले आहे. या कामगिरीबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

लसीकरण मोहिम राबविताना नागरिकांना त्यांच्या घराजवळ लस घेणे सोपे जावे याकरिता महानगरपालिकेने 111 पर्यंत लसीकरण केंद्रे सुरू केली. लसीच्या उपलब्धतेनुसार केलेले लसीकरणाचे नियोजन आणि आरोग्याविषयी जागरूक नवी मुंबईकर नागरिकांनी महानगरपालिकेच्या आवाहनाला दिलेला प्रतिसाद यामुळे हे उद्दिष्ट साध्य झाल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले.

सध्या कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी कोरोना अद्याप पूर्णपणे संपलेला नाही याची जाणीव ठेवून ज्येष्ठ नागरिकांनी वेळेत आपला तिसरा अर्थात प्रिकॉशन डोस घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री. बांगर यांनी केले आहे. लसीकरण झालेले असल्यामुळे कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याचे चित्र तिसऱ्या लाटेत अनुभवता आले. लसीच्या पहिल्या डोसचे 100 टक्के लसीकरण पूर्ण करणारी नवी मुंबई ही पहिली महानगरपालिका होती. तोच वेग कायम राखत नवी मुंबई महानगरपालिकेने दस-या डोसचेही लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना लस संरक्षित करण्याकडे विशेष लक्ष दिले. त्या अनुषंगाने शासनामार्फत महानगरपालिकेस देण्यात आलेले 18 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाचे 11 लाख 07 हजार इतके उद्दिष्ट नवी मुंबई महानगरपालिकेने पार केले असून आजतागायत 11 लाख 07 हजार 454 नागरिकांना कोव्हीड लसीचे दोन्ही डोस देण्यात आल्याचे महापालिका लसीकरण अधिकारी डॉ. रत्नप्रभा चव्हाण यांनी सांगितले.