आता हवी ‘झाडू’ झडती! 

क्रिकेट आणि राजकारण या दोन विषयांबद्दल प्रचंड प्रेम असणाऱ्या देशात या दोन्ही क्षेत्रांत कोणी चमकदार कामगिरी बजावली की पुढील काही दिवस त्या व्यक्तीस ‘स्टारडम’ प्राप्त होत असते. अशा वलयांकित व्यक्तीत अरविंद केजरीवाल यांचे नाव आजच्या घडीला आघाडीवर आहे. चार राज्ये जिंकून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाची जेवढी चर्चा झाली नाही तेवढी केजरीवाल यांची होत आहे. पंजाबमध्ये ११७ जागांपैकी ९२ जागा जिंकणारा ‘आप’ हाच भावी काळात भाजपाला तगडे आव्हान देईल आणि केजरीवाल हे मोदींना पर्याय ठरतील इतपत या चर्चेचा आलेख उंचावला आहे. सचिन – सेहवाग – धोनीच्या सावलीतून बाहेर पडलेल्या भारतीय संघात विराट – रोहित – राहुल यांच्या नावाची जशी चर्चा झाली तसाच काहीसा हा प्रकार आहे. अर्थात या दोन्ही खेळांचे नियम वेगळे आहेत आणि त्यामुळे केजरीवाल हेच देशाचे भावी नेतृत्व आहे, असे म्हणणे धाडसाचे ठरेल.
भ्रष्टाचाराविरुद्ध अण्णा हजारे यांनी पुकारलेल्या एल्गाराचे केजरीवाल हे प्रमुख कार्यकर्ते होते. प्रशासकीय सेवेतील करिअर त्यागून देशाला भेडसावणाऱ्या आणि एकुणातच सामाजिक अध:पतनास कारणीभूत ठरलेल्या महारोगाविरुद्ध धगधगत असलेला असंतोष आणि अस्वस्थता यांना अण्णांनी आवाज मिळवून दिला होता. त्या अरण्यरुदनाच्या ‘कोरस’मधील एक प्रमुख गायक केजरीवाल होते. जातीपातीच्या आणि धर्माधिष्ठित मतभेदांच्या भिंती उभारून आपले इमले बांधणाऱ्या राजकारण्यांनी भ्रष्टाचाराचा खुबीने वापर केला होता. लोकांचे लक्ष ‘नॉन – इश्यू’ कडे वेधून खरा मुद्दा ‘भ्रष्टाचार’ गालिच्याखाली ढकलण्याचा अत्यंत बेरकी दुष्टपणा नेते करीत होते. आजही करीत आहेत. अण्णा हजारे, केजरीवाल आणि इतर अनेक (अर्थात त्यापैकी बरेच जण पुढे या चळवळीपासून अलिप्त तरी झाले किंवा दूर सारले गेले) यांनी भ्रष्टाचाराला ‘सेंटर- स्टेज’ वर आणून जात-पात -धर्म यांना ‘विंगेत’ टाकले. दिल्लीतील जनतेने २०१४ मध्ये लोकसभेत मोदींना भरभरून कौल दिल्यावर काही महिन्यांत केजरीवाल यांच्या ‘आप’ ला पसंती दिली. देशाच्या विकासाचे स्वप्न दाखवण्यापूर्वी भ्रष्टाचार झाडून अंगण स्वच्छ करायला हवे, हा विचार मतदारांनी कौल देऊन मांडला. दिल्लीत ‘आप’ ने केलेले काम हे आदर्श व्यवस्थेचे मॉडेल बनले, जसे मोदींच्या गुजरातचे झाले तसे. एक मॉडेल जर देशाचा पंतप्रधान ठरवू शकते तर मग केजरीवाल यांना हा निकष का लावला जाऊ नये, असे सध्या सुरू असलेल्या चर्चेचे मूळ आहे.
अर्थात पंजाबचे यश हे पूर्णतः दिल्ली मॉडेलमुळे प्रभावित होऊन मिळाले आहे असे म्हणता येणार नाही. काँग्रेस असेल किंवा शिरोमणी अकाली दल यांनी केलेल्या चुकांचा ‘आप’ ने लाभ उचलला असे म्हणावे लागेल. या दोन्ही पक्षांना मतदारांनी नाकारले ते ‘आप’ प्रेमापोटी की जुन्या खोडांना धडा शिकवण्यासाठी? म्हणजे उद्या या दोन पक्षांबद्दलची अढी दूर झाली तर ‘आप’ ला ते नाकारूही शकतात. याचा अर्थ असा की ‘आप’ ला मतदारांच्या अपेक्षांना उतरण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार. त्यांची खरी कसोटी तर आता सुरू होत आहे. पंजाबमधील जनतेला प्रादेशिक अस्मितेची झालेली छेडछाड, जातीचे राजकारण आणि राज्यकर्त्यांची उदासिनता यांचा वीट आला होता. या तिन्ही गोष्टींना समर्पक उत्तर केजरीवाल शोधू शकले आणि मुख्यमंत्रीपदाचे दावेदार भगवंत मान यांनी त्याची अंमलबजावणी केली तर पंजाबमध्ये लोकाभिमुख राजवटीची पहाट झाली असे म्हणता येईल.
पंजाबचे काय होईल यापेक्षा केजरीवाल नामक ‘आप’ प्रयोग देशातील अन्य राज्यांत चालेल काय, हा प्रश्न राजकीय निरीक्षकांमध्ये सध्या चर्चेत आहे. ‘आप’ च्या धोरणांना शहरी मतदार पसंती देत असतात, हे दिल्लीत आपण पाहिले. सुरत महानगरपालिकेत त्यांना त्याचे प्रत्यंतर आले होते. अशा वेळी मुंबई महापालिका असो की  राज्यातील अन्य स्थानिक स्वराज्य संस्था येथे ‘आप’ चा झाडू (की जादू?) चालेल काय यावर गंभीरपणे विचार सुरू  झाला आहे. ‘मै भी केजरीवाल’ अशा प्रकारची लोकभावना रूजू लागली आहे. मतदारांचा मूड प्रस्थापित राजकारण्यांविरुद्ध आहे, पण त्यांना पराभूत करण्याची क्षमता जनतेत नाही. या मतदारांना एकत्र आणून ‘आप’ ची मूळी करता येईल काय, असा विचार आपापल्या परीने ‘झाडू’ मारणाऱ्या जागरूक कार्यकर्त्यांच्या मनात येऊ लागला आहे. प्रत्येक पक्षात असे सच्चे आणि तळमळीचे कार्यकर्ते असतात. त्यांना स्थान मिळत नसते. त्यांचा आवाज दाबण्याचाच प्रयत्न होत असतो. अशी मंडळी एकेकाळी मोदींकडे आकर्षित झालेली आपण पाहिली. आता तोच प्रकार केजरीवाल यांच्या बाबतीत होऊ शकतो. केवळ भ्रष्टाचाराविरुद्ध लढणे मतदारांना भावणार नाही. त्यास रचनात्मक आणि ठोस अशा धोरणांची जोड लागेल. मुंबई असो की ठाणे येथील नागरी प्रश्नांचा सखोल अभ्यास करून पर्याय शोधला गेला तर काय सांगावे ‘झाडू’ ची जादू चालेलही. त्यासाठी भ्रष्टाचाराचे तुणतुणे वाजवत बसणे पुरेसे ठरणार नाही. ही झाडाझडती वेळेचा अपव्यय करणारी ठरते. आता हवी आहे ती ‘झाडू’ झडती. सकारात्मक आणि सक्रिय वातावरण करण्यासाठी बघू या ‘आप’ प्रेरित नेते काय करतात ते !