निरुत्साही वातावरण, इच्छुकांमध्ये संभ्रम
अंबरनाथ – अंबरनाथ नगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज गुरूवारी (१० मार्च रोजी) प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. नवीन प्रभाग रचनेच्या आराखड्यानुसार अंबरनाथला दोन नगरसेवकांची संख्या वाढणार आहे. पूर्वी ५७ असलेली प्रभाग संख्या आता ५९ होणार आहे.
व्दिसदस्यीय प्रभाग पध्दतीतून अंबरनाथमध्ये २९ वॉर्ड आणि ५९ नगरसेवक निवडून द्यावे लागणार आहेत. ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून राज्य सरकार आणि निवडणूक आयोगातील गोंधळामुळे निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याच्या शक्यतेने प्रभाग रचना प्रसिद्ध होवूनही राजकीय पक्ष आणि उमेदवारांमध्ये संभ्रम आणि निरूत्साह दिसून आला.
अंबरनाथ नगरपालिकांमध्ये कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे प्रशासकीय राजवट लागू आहे. ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात पालिका निवडणुका होणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले असले तरी निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. आयोगाच्या निर्देशानुसार पालिकांनी प्रारूप प्रभाग रचनांची तयारी सुरू केली होती. त्यानुसार आज १० मार्च रोजी अंबरनाथ नगरपालिकेची प्रारूप प्रभाग रचना प्रसिध्द करण्यात आली. नवीन आराखड्यानुसार अंबरनाथ मध्ये द्वीसदस्यीय प्रभाग पध्दत लागू केली जाणार आहे. त्यानुसार अंबरनाथमध्ये दोन सदस्यांचे २९ वॉर्ड तर उर्वरित तीन सदस्यांचा एक वॉर्ड राहणार असून पूर्वी असलेल्या ५७ नगरसेवकांमध्ये नवीन प्रभाग रचनेनुसार मात्र दोन नगरसेवकांची भर पडणार आहे. त्यामुळे अंबरनाथमध्ये एकूण ५९ प्रभाग राहणार आहेत.