ठाणे – मागील तीन वर्षे विविध नागरी सुविधांच्या कामाकरिता पाठपुरावा करून देखील निधी मिळत नसल्याने सत्ताधारी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या दालनासमोर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
ओवळा माजीवडा विधानसभा मतदारसंघामधील उपवन येथील बनारस घाट आणि घोडबंदर मार्गावरील पादचारी पुलाच्या कामाला तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंजुरी दिली होती. बनारस घाटाचे काम देखील सुरू करण्यात आले होते. परंतु मागील दोन वर्षे कोरोना काळात या कामाला ब्रेक लावण्यात आला होता. मागील वर्षी ४५५ कोटीच्या अर्थसंकल्पात देखील या कामासाठी निधी ठेवण्यात आला नसल्याने महापालिका आयुक्त, अधिकारी यांच्याबरोबर सतत पाठपुरावा करून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी या कामाला निधी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. परंतु अजूनही त्या कामाला सुरुवात करण्यात आली नसल्याचे आ. सरनाईक यांनी विधानसभा अध्यक्ष यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. त्यांच्या मतदार संघात आरक्षित भूखंडावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत. काही ठिकाणी अनधिकृत लेडीज बार देखील बांधण्यात आले आहेत. त्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी यासाठी पाठपुरावा करून देखील कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही असा आरोप आ. सरनाईक यांनी केला आहे.
महापालिकेने पादचारी पुलाचे काम सुरू केले नाही, त्यामुळे घोडबंदर मार्गावर अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू देखील झाला आहे. अनेक जण जखमी झाले असल्याचे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. या जुन्या कामांना निधी दिला जात नाही आणि नवीन कामे देखील मंजूर करण्यात येत नसल्यामुळे नाइलाजाने सत्ताधारी पक्षाचा आमदार असतानाही आयुक्तांच्या दालनाबाहेर उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र आ. सरनाईक यांनी ७ मार्च रोजी दिले होते. त्यावर आज बैठक घेण्यात येणार होती. मात्र त्यापूर्वीच महापालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांनी आ.सरनाईक यांना लेखी पत्र पाठवून निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. परंतु या उत्तराने त्यांचे समाधान झाले नसून १४ मार्च पर्यंत अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आणि नागरी सुविधांच्या कामांना सुरुवात झाली नाही तर १६ मार्चपासून आयुक्तांच्या दालनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा इशारा आ. सरनाईक यांनी दिला आहे.