एस. श्रीसंतने भारतीय क्रिकेट संघाला दोनदा विश्वविजेता बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पण मॅच फिक्सिंगमुळे त्याच्यावर बंदी घालण्यात आली. बंदी उठल्यानंतर पुन्हा एकदा तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला आणि त्याने टीम इंडियातही पुनरागमन दाखविण्याचा आशेचा किरण त्याच्या चाहत्यांना दाखवला. पण सलग दोन आयपीएल लिलावाट दुर्लक्ष आणि वृद्धत्व यामुळे त्याच्या कारकिर्दीला ब्रेक लागला. श्रीसंतने बुधवारी, ९ मार्च रोजी सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. श्रीसंतने आधी एकामागून एक ट्विट केले आणि नंतर लाइव्ह येऊन ही दुःखद बातमी चाहत्यांसोबत शेअर केली.
निवृत्तीची घोषणा करताना श्रीसंत खूप भावूक दिसत होता. श्रीसंतच्या डोळ्यांत दिसत होते की त्याला अजूनही खेळायचे आहे पण परिस्थितीमुळे त्याला निवृत्ती घ्यावी लागली. त्याने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये त्याचे डोळे भरून आले होते पण त्याने डोळ्यातून अश्रू येऊ दिले नाहीत. ही बातमी ऐकून ३९ वर्षीय श्रीसंतने त्याच्या करोडो चाहत्यांना नक्कीच रडवले आहे. निवृत्तीपूर्वी तो देशांतर्गत रणजी स्पर्धेत खेळताना दिसला होता. अशा परिस्थितीत तो अजूनही हार मानणार नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी अपेक्षा होती, परंतु तसे झाले नाही आणि आणखी एका स्टार खेळाडूने भारतीय क्रिकेटला अलविदा केला.