ठाणे : कळवा आणि मुंब्रा रेल्वे स्थानकादरम्यान असलेल्या मुंब्रा रेल्वे पुलाच्या कामास अखेर मुहूर्त मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच रेल्वे विकास महामंडळाने पुलाच्या निर्माणाची निविदा काढली आहे.
२०१३ मध्ये या रेल्वे पुलाच्या कामास मान्यता मिळाली होती. त्यानुसार सध्या अस्तित्वात असलेल्या जुन्या रेल्वे पुलाजवळ नव्या पुलाचे खांबही उभारण्यात आले होते. आरेखनात बदल झाल्याने तसेच पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे हे काम रखडले होते. आता पुन्हा या कामास सुरुवात होणार आहे. मुंब्रा येथील रेल्वे पूल तयार झाल्यास मुंब्रा स्थानक, शिळफाटय़ाच्या दिशेने जाणाऱ्या वाहन चालकांना रुंद रस्ता उपलब्ध होणार आहे.
कळवा व मुंब्रा रेल्वे स्थानकांदरम्यान रेतीबंदर जवळ मुंब्रा रस्त्याला जोडणारा मुंब्रा रेल्वे पूल आहे. मुंब्रा बाह्यवळण मार्गाखालील हा रस्ता असल्याने येथून हजारो हलकी वाहने, बस मुंब्रा, कळवा, शिळफाटय़ाच्या दिशेने वाहतूक करत असतात. हा पूल अरुंद असल्याने २०१३ मध्ये या पुलाशेजारी नवा रेल्वे पूल बांधून सध्या अस्तित्वात असलेला जीर्ण पूल तोडण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार संबंधित कंत्राटदाराने पूल उभारणीचे काम सुरू करून रेल्वे पुलासाठी लागणारे खांबही उभारले होते.
ठाणे ते दिवा या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामामुळे तसेच रेल्वे पुलाच्या आरेखनामध्ये काही तांत्रिक बदल करावे लागत असल्याने रेल्वे प्रशासनाने हे काम थांबविण्याचा निर्णय घेतला होता. पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण झाल्याने काही दिवसांपूर्वीच मुंबई रेल्वे विकास महामंडळाने या पुलाच्या निर्माणासाठी निविदा काढली आहे. या पुलाच्या निर्माणासाठी व सद्यस्थितीत असलेल्या जीर्ण पुलाच्या पाडकामासाठी ३१ कोटी ५३ लाख ३९ हजार ६२६ रुपये इतका अंदाजित खर्च व्यक्त केला जात आहे.
जलद मार्गावर मेगाब्लॉक
रेल्वे पुलाच्या भागाचे काम हे रेल्वे प्रशासन करणार आहे. तर त्यापुढील काही मीटर अंतराचे काम ठाणे महापालिकेकडून केले जाणार आहे. पावसाळय़ाचा कालावधी वगळता १५ महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या कामासाठी जलद मार्गावर मेगाब्लॉक घेण्याची शक्यताही आहे.