भाजप नेत्यांना अडकवण्याचे राज्य सरकारचे षडयंत्र, अधिवेशनात आरोप
मुंबई – राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांना अडकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह सादर करून केला. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडून अडकवण्याचा प्रयत्न करण्यात येत असलेल्या नेत्यांची नावेही सभागृहामध्ये सांगितली.
आज राज्याच्या विधानसभेमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर विधानसभा नियम 293 अन्वये विरोधी पक्षाच्या प्रस्तावावर बोलताना फडणवीस यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राची पोलीस व्यवस्था ही प्रगल्भ आहे. मला महाराष्ट्र पोलिसांचा अभिमान आहे. पण या पोलीस दलाचा गैरवापर होत आहे. विरोधक संपवायचे षडयंत्र जर सरकार करेल, तर लोकशाही धोक्यात येते. माझ्यासह, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, हे भाजपाचे नेते राज्य सरकारच्या टार्गेटवर आहेत. त्यांच्या फाईल तयार आहेत, असे संभाषण झाल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना संपवण्याचा साहेबांचा मानस आहे, असे विधानही संभाषणात केल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
दरम्यान, भाजपाच्या नेत्यांना अडचणीत आणण्यासाठी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी सगळे आदेश दिले. धाडी कशा टाकायच्या, चाकू कसे ठेवायचे, मोक्का कसा लावायचा, यासंदर्भात सगळ्या सूचना चव्हाण यांनी दिल्या. सरकारच्या मदतीने हे कारस्थान शिजले, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. तसेच सीएम रिलीफ फंडावरून तक्रारीसाठी षडयंत्र रचले गेले, असा आरोपही फडणवीस यांनी केला. अनिल गोटे, राज्याचे एक मंत्री, दोन माणसं अजून आणि एक डॉक्टर यांच्यात मुंबईतील मोठ्या एका हॉटेलमध्ये बैठक झाली. त्या बैठकीत डॉक्टरला सांगण्यात आले की, मुख्यमंत्री मदतनिधीबाबत तक्रार कर. आम्ही ती रजिस्टर करतो. फडणवीस यांच्यावर थेट होणार नाही. ती ओमप्रकाश शेटेवर होईल. त्यामाध्यमातून आम्ही ती रजिस्टर करू. सोलापूर ग्रामीणमध्ये आम्हाला हा व्हिडीओ रजिस्टर करू, असा कट आखण्यात आल्याचा दावा फडणवीस यांनी केला.