प्रभारी उपआयुक्त पदावरून सावंत यांची हकालपट्टी

भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेतील बदलीने नियुक्त झालेल्या दोघा उपआयुक्तांना अभयदान देत प्रभारी उपआयुक्तपदी नियुक्त झालेल्या स्वप्नील सावंत यांची या पदावरून तडकाफडकी हकालपट्टी करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर प्रभाग अधिकारी म्हणून देखील त्यांच्याकडे असलेला पदभार काढून घेण्यात आल्याने पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आकृतीबंधानुसार या महानगरपालिकेत एकूण उपआयुक्त पदाची 04 पदे आरक्षित आहेत. यापैकी 02 उपआयुक्त प्रतिनियुक्तीने तर 02 उपआयुक्त पदे महानगरपालिकेतील सेवाज्येष्ठ व अर्हताप्राप्त अधिकाऱ्यांमधून निवड करण्यात येणार आहे. त्यानुसार अजित मुठे आणि रवि पवार यांची प्रतिनियुक्तीने उपआयुक्त पदी नियुक्ती झालेली आहे. तर मारूती गायकवाड आणि संजय शिंदे यांची बदलीने या महानगरपालिकेच्या उपआयुक्त पदी निवड करण्यात आलेली आहे. याच वेळी प्रभाग क्र.06 चे प्रभाग अधिकारी स्वप्नील सावंत यांचीदेखील प्रभारी उपआयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली होती.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत बदलीने नियुक्ती करण्यात आलेल्या मारूती गायकवाड आणि संजय शिंदे यांच्या उपआयुक्त पदावरील नेमणूकीला भाजपाने जोरदार आक्षेप घेतला होता. या संदर्भात मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चादेखील झाली होती. त्यावेळी महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षिय गटनेत्यांच्या बैठकीत या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी केली होती. त्यानुसार गटनेत्यांच्या बैठकीत प्रशासनाची बाजू मांडताना स्वप्नील सावंत, संजय दोंदे, सुनिल यादव आणि दिलीप जगदाळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामार्फत चौकशी सुरू असल्यामुळे हे अधिकारी पदोन्नतीस अपात्र असल्याचे आयुक्त दिलीप ढोले यांनी सांगितले होते. त्याचप्रमाणे सुदाम गोडसे या सेवाज्येष्ठ व अर्हताप्राप्त अधिकाऱ्याने राज्य शासनाकडून सहाय्यक पालिका आयुक्त पदावरील त्यांच्या नियुक्तीस मान्यता प्राप्त करून आणल्यास त्यांची उपआयुक्त पदी नियुक्ती करण्याबाबत विचार केला जाईल, असे ढोले यांनी या बैठकीत स्पष्ट केले होते.

या महानगरपालिकेत बदलीने उपआयुक्त पदी नियुक्त झालेले मारूती गायकवाड आणि संजय शिंदे यांना अभयदान देतानाच प्रभारी उपआयुक्त पदी नियुक्ती झालेल्या स्वप्नील सावंत यांची आयुक्त दिलीप ढोले यांनी तडकाफडकी हकालपट्टी केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडे प्रभाग अधिकारी पदाचा असलेला कार्यभारदेखील काढून घेण्यात आलेला असून त्यांच्या जागी शासन नियुक्त असलेले सहाय्यक पालिका आयुक्त योगेश गुनीजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. स्वप्नील सावंत यांच्याकडे आता परिवहन विभागाचे उपव्यवस्थापक हे पद देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सहाय्यक आयुक्त प्रियंका भोसले यांच्याकडे शिक्षण विभागाचा अतिरीक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. उपआयुक्त संजय शिंदे यांच्याकडे महिला व बालकल्याण विभाग तसेच परवाना विभाग सोपविण्यात आलेला आहे. तर अजित मुठे यांच्याकडे पशुसंवर्धन विभागाच्या अतिरीक्त पदाचा पदभार सोपविण्यात आलेला आहे. रवि पवार यांच्याकडे समाजविकास विभागाचा अतिरीक्त पदभार देखील सोपविण्यात आलेला आहे.