कल्याण: कल्याण शहर ज्वेलर्स असोशिएशनच्या वतीने शहरातील मोक्याच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. या कामाचा शुभारंभ महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या हस्ते आज करण्यात आला.
बाजारपेठेतील एका सभागृहात आयोजित सभारंभात वरिष्ठ पोलीस निरिक्षक होनमाने यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या प्रसंगी कल्याण शहर ज्वेलर्स असोशिएशनचे अध्यक्ष राकेश मुथा, उपाध्यक्ष पराग जैन, नितीन जैन, सचिन घोडके, सचिव मदन शंकलेशा, सहसचिव सुनेख जैन, खजिनदार रवी जैन, भूषण शहा, महेंद्र शंकलेशा यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.
व्यापारी वर्गाने दिलेल्या सहकार्यातून बाजारपेठ परिसरातील मोक्याच्या ठिकाणी 25 सीसीटीव्ही कार्यक्रम बसविले जाणार आहेत. ‘एक कॅमेरा देशासाठी आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी’ आवश्यक असल्याची बाब वरिष्ठ पोलिस निरिक्षक होनमाने यांनी अधोरेखित केली. तिसरा डोळा कार्यान्वीत झाल्याने बाजारपेठ परिसरात घडणाऱ्या गुन्ह्यावर देखरेख ठेवणे शक्य होणार आहे. तसेच, काही गुन्हा घडल्यास आरोपी पकडण्याकरीता सीसीटीव्हीची मदत होणार आहे. कॅमेऱ्यामुळे 24 तास तिसऱ्या डोळ्य़ाच्या माध्यमातून सुरक्षेची हमी मिळणार आहे. महात्मा फुले पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पाच पोलिस बीटमध्ये व्यापारी आणि नागरीकांच्या सहभागातून ३९४ ठिकाणी सीसीटीव्ही लावण्यात आले आहे. या सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांची उकल करण्यास मदत होत असल्याचेही होनमाने यांनी सांगितले.