पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून ठाणेकरांना आगळी भेट
ठाणे : गेल्या दोन ते अडीच वर्षांत कोरोनामुळे आर्थिक संकट निर्माण होऊन शहरातील विकासकामांना खीळ बसली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील एकात्मिक रस्त्यांसाठी २१४ कोटींचा निधी उपलब्ध करून दिल्याने ऐन निवडणुकीच्या काळात कोंडीत अडकलेल्या नगरसेवकांना दिलासा मिळाला आहे.
पालकमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणेकरांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच ठाणेकरांना सुसज्ज रस्ते मिळावेत यासाठी महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधा विकास या योजने अंतगर्त नियोजित एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पा करता २१४ कोटींचा भरीव निधी उपलब्ध करून दिला आहे. यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिनंदन करणारा ठराव जेष्ठ नगरसेवक राम रेपाळे यांनी मांडला तर नुकत्याच झालेल्या महासभेत या ठरावाला रमाकांत मढवी यांनी अनुमोदन दिले. रेपाळे यांनी मांडलेल्या हा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला.
दोन वर्षात कोरोनामुळे ठाणे पालिका परिसरात एकही नवे विकासकाम करण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे २०१९ मध्ये करण्यात आलेली विकासकामे, २०२० सालची कामे तसेच २०२१ ची काही कामे याचे जवळपास ४ हजार कोटीचे दायित्व पालिकेच्या तिजोरीवर असल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली, आणि त्यातच पालिकेचे उत्पन्नही या काळात मोठ्या प्रमाणात घसरल्याने मोठी कोंडी निर्माण झाल्याची स्थिती होती. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक जवळ आली असताना विकासकामे झाली नाहीत तर मते कशी मागायची असा प्रश्न नगरसेवकांसमोर उभा ठाकला होता.
याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे नगरविकास खाते ठाणेकरांच्या मदतीला धावून आले असून ठाणे शहरातील रस्त्यासाठी २४१ कोटींचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीमध्ये शहरातील उर्वरित रस्ते पूर्ण करण्याचा संकल्प महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आला असून येत्या महिन्यात उरलेले रस्ते सुसज्ज होणार आहेत.