जिल्हा कोरोनामुक्तीच्या दिशेने; दैनंदिन रुग्ण संख्येचा नीचांक

ठाणे : दोन वर्षांपासून मुक्कामी असलेला कोरोना ठाणे जिल्ह्यातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून ते आतापर्यंत रुग्ण संख्येने पहिल्यांदाच नीचांक गाठला असून दैनंदिन रुग्ण संख्या २३ वर आली आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रभाव असलेल्या ठाणे शहरातील दैनंदिन रुग्ण संख्या १५ पर्यंत खालावली आहे.

कल्याण-डोंबिवलीमध्ये तीन, नवी मुंबई येथे पाच, मीरा-भाईंदर, उल्हासनगर, भिवंडी, अंबरनाथ बदलापूर आणि ठाणे ग्रामीण क्षेत्रात रोज शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्ण संख्या ही ३२३ पर्यंत आल्याने ठाणे जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीच्या दिशेने सुरू झाली आहे. मार्च २०२० मध्ये दाखल झालेल्या कोरोनाच्या पहिल्या लाटेने अवघ्या पाच महिन्यात ठाणे शहरात ९०० रुग्णांचा मृत्यू झाला. तर एक वर्षानंतर एप्रिल २०२१मध्ये धडकलेल्या दुसऱ्या लाटेने दैनंदिन रुग्णसंख्या तीन हजारांच्या घरात पोहचली. शेकडो तरुणांससह वृद्धांचा जीव गेला. त्यामुळे ओमिक्रॉनच्या धास्तीसह आलेल्या जानेवारी २०२२ मधील तिसऱ्या लाटेची दहशत पसरली होती. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या सर्वाधिक होती. पण लसीकरणामुळे मृत्यूचे प्रमाण आटोक्यात होते. त्यामुळे तिसNया लाटेवर अवघ्या दिड महिन्यात नियंत्रण आणण्यात आरोग्य यंत्रणेला यश आले अहे.

ठाणे शहरात १५रूग्ण सापडले आहेत. सर्वाधिक आठ रुग्णांची नोंद माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात झाली आहे. चार जण वर्तकनगर येथे मिळाले आहेत. प्रत्येकी एका रुग्णाची नोंद लोकमान्य सावरकर, नौपाडा-कोपरी आणि उथळसर प्रभाग समिती परिसरात झाली आहे. वागळे, कळवा, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती भागात शून्य रुग्णांची नोंद झाली आहे तर १९जण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्णालयात अवघे १० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यातील गेल्या आठ दिवसांच्या कोरोना रुग्णसंख्येचा आढावा घेतला असता २० फेब्रुवारीला एकुण नवीन रुग्णांची नोंद ७४ झाली होती. तर १,११० रुग्ण सक्रीय होते. २१ फेब्रुवारीला रुग्णसंख्येत घट होऊन ती ५१ वर आली. सहा दिवस ही रुग्णसंख्या स्थिर होती. त्यानंतर प्रथमच जिल्ह्याची दैनंदिन रुग्णसंख्या ५०च्या आत म्हणजे २३ वर आली. सक्रीय रुग्णसंख्याही निम्म्याने कमी होऊन ३२३ झाली. तर २८ फेब्रुवारीला जिल्ह्यात अवघ्या २२ नवीन रुग्णांची भर पडली. कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून आतापर्यंत गेल्या दोन वर्षातील हा पहिला निच्चांक समजला जात आहे.

१ मार्चला पुन्हा ३० नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन रुग्णांची नोंद कमी होत असल्याने ही आकडेवारी आणखी कमी झाल्यास किंवा स्थिर राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आजच्या घडीला ३२३ रुग्ण सक्रीय असून बहुतेक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. २० फेब्रुवारीला ही आकडेवारी हजाराच्या पुढे होती. ती आता निम्म्यापेक्षा कमी झाली आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत असली तरी शून्य मृत्यूचे आव्हान अजूनही कायम आहे. गेल्या आठ दिवसांत १३ मृत्यू झाल्याची नोंद आहे. २० आणि २८ फेब्रुवारी अपवाद वगळता रोज एक ते तीन मृत्यूची नोंद होत आहे.