महासभेच्या समारोपात सेनेचे स्वबळाचे संकेत

९० जागा सेनेच्या; उर्वरित जागांसाठी विरोधकांना शुभेच्छा

ठाणे : आगामी ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे ९० नगरसेवक निवडून येतील असा अंदाज महापौर नरेश म्हस्के यांनी महासभेच्या समारोप सत्रात व्यक्त करत उर्वरीत ५२ जागांसाठी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष आता कोणती भूमिका घेणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ठाणे महापालिकेची शेवटची महासभा गुरुवारी रात्री ११ वाजेपर्यंत रंगली. यावेळी महापौरांवर स्तुती सुमने उधळण्याबरोबर काहींनी टिका देखील केली. तर काहींना महापौरांनी शालजोडीतील टोले हाणले. पाच वर्षाच्या कार्यकाळाचा हा कौतुक सोहळा सुरु असतांनाच शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी शिवसेना ९० जागांवर निवडून येणार असल्याचा दावा केला. त्याला महापौर नरेश म्हस्के यांनी दुजोरा देत राष्ट्रवादीला सावधानतेचा इशारा दिला. शिवसेना महापालिकेत ९० जागांवर निवडून येईल असे सांगतांना उर्वरीत जागेवर विरोधकांनी निवडून येण्यासाठी त्यांनी शुभेच्छाही दिल्या. या शुभेच्छा देत असतांना राष्ट्रवादीकडून आजवर झालेल्या वर्तनाचा पाढाही त्यांनी यावेळी वाचला.

मागील काही दिवसापासून शिवसेना आणि राष्ट्रवादीत प्रभाग रचनेवरुन चांगलाच वांदग उठला आहे. परंतु या वादावर पडदा टाकण्याचे काम गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषद घेऊन करण्याचा प्रयत्न केला. आम्ही आघाडीसाठी तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि आव्हाड यांनी पुन्हा आघाडीचे गोडवे गायले. मात्र त्यानंतर महापौर म्हस्के यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बहिष्कार टाकल्याने त्यांनी या बाबत गुरुवारच्या महासभेत जाहीर नाराजी व्यक्त केली. तुम्हाला असेच करायचे असेल तर आम्हाला आमचा मार्ग मोकळा असल्याचे सांगत एक प्रकारे त्यांनी आघाडी तुटल्याचेच संकेत दिले आहेत.