मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरला राज ठाकरेंचा आवाज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या बरेच चर्चेत आहेत. मराठी चित्रपटसृष्टी आणि राज ठाकरे यांचं तसं फार जुनं नातं आहे. पण आता त्यांनी मराठीतील एका ऐतिहासिक चित्रपटाच्या टीझरसाठी आवाज दिलाय. राज ठाकरे यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या व्हिडीओमधील राज ठाकरे यांच्या दमदार आवाजानं सर्वांची मनं जिंकली आहेत.

मराठीतील आगामी ऐतिहासिक चित्रपट ‘हरहर महादेव’च्या टीझरसाठी राज ठाकरे यांनी आवाज दिलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. “जेव्हा माय माऊलीची बेअब्रू आणि मंदिराला तडा गुन्हा नव्हता, जेव्हा सह्याद्रीला कणा आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे..हर हर महादेव,” ही राज ठाकरेंच्या आवाजातील वाक्यं ऐकल्यावर अंगावर अक्षरशः काटा येतो.

अभिजित देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला. ज्यात राज ठाकरे यांचा आवाज सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. ‘झी स्टुडिओज’नं आतापर्यंत एकापेक्षा एक दर्जेदार कलाकृती प्रेक्षकांच्या भेटीला आणल्या आहेत. याच पंक्तीत आता ‘हर हर महादेव’ हे आणखी एक नाव सहभागी होणार आहे.