* व्यायामशाळा-समाज मंदिरांचा प्रश्न मार्गी
* महासभेत प्रस्ताव मंजूर
ठाणे : शहरातील व्यायामशाळा, समाजमंदिरे आदी वास्तू संस्थांना रेडीरेकनर दरानुसार न देता किमान किंवा नाममात्र दराने देण्याचा प्रस्ताव आज गुरुवारी झालेल्या महासभेत मंजूर करण्यात आला. भाजप नगरसेवकांनी या प्रस्तावास पाठिंबा दिल्याने गेल्या काही वर्षांपासून या वास्तूंबाबतचा रखडलेला प्रश्न आता मार्गी लागला आहे.
गुरुवारी महासभेत भाजपच्या नगरसेविका कविता पाटील यांनी या मुद्याला हात घालत, समाज मंदिर किंवा व्यायामशाळा या संदर्भात मुद्दा उपस्थित केला. त्यावर महापौर नरेश म्हस्के यांनी पूर्वी किमान नाममात्र दरातच या वास्तु संस्थांना उपलब्ध करुन दिल्या जात होत्या , असे सांगितले. त्यामध्ये आमदार, नगरसेवक यांच्या निधीतून या वास्तु उभारल्या जात होत्या. परंतु त्या नाममात्र दरात देण्यात येऊ नये यासाठी विधी मंडळात एका लोकप्रतिनिधीने लक्षेवधी मांडली होती. त्यानंतर या वास्तु रेडीरेकनर दरानुसार देण्याच निश्चित करण्यात आल्या, त्यामुळे या वास्तु घेण्यास संस्था पुढे येईनाशा झाल्या. या वास्तुंची देखील दुरावस्था झाली. परंतु कोणत्या लोकप्रतिनिधीने ही मागणी केली होती, असा सवाल शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी उपस्थित केला. परंतु महापौरांनी यात पुन्हा राजकारण न करता नाव सांगणे उचित नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु हाच मुद्दा धरुन राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी आमदार संजय केळकर यांनीच तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कार्यकाळात हा मुद्दा उपस्थित करुन त्याची लक्षवेधी मांडली होती. त्यावेळेस महाराष्ट्रात भाजपचे सरकार होते, असा टोलाही त्यांनी लगावला. त्यामुळे चुक पालिका प्रशासनाची नाही तर तुमच्या सरकारची होती. असेही त्यांनी सुनावले. यावरुन काहीसा गोंधळ सभागृहात झाला. अखेरीस या वास्तु किमान नाममात्र दरात उपलब्ध करुन देण्याची मागणी भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लावून धरली. अखेर त्या संदर्भातील ठराव करण्यात आला. त्याला भाजप नगरसेवकांनी पाठींबा दिला.
मागील पाच वर्षात आमच्या प्रभागात असलेल्या समाज मंदिराचा लाभ केवळ एकाच नगरसेवकाला मिळाला आहे. उर्वरीत तीन नगरसेवकांना त्याचा लाभ का मिळालेला नाही, कि केवळ एकाच नगरसेवकासाठीच ते समाज मंदिर होते का? असा सवाल शिवसेनेच्या नगरसेविका रागिनी बैरीशेट्टी यांनी उपस्थित करीत शिवसेनेच्या इतर सदस्यांना अडचणीत आणल्याचा प्रकार सभागृहात पाहायला मिळाला.
याबाबत आमदार संजय केळकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या बाबत आपण अधिवेशनातही वाचा फोडली होती असे सांगितले. ठाण्यात अनेक संस्था या सेवाभावी वृत्तीने कोणत्याही आर्थिक फायद्याशिवाय काम करत आहेत, अशा संस्थांना नाममात्र दराने किंवा कमीत कमी दरात त वास्तू वापरास देण्यास कोणतेही दुमत नाही, पण काही संस्था या केवळ व्यवसाय- धंदा करून या वास्तूंचा गैरवापर करत आहेत. अशांना रेडीरेकनर दरानेच वास्तू वापरास देण्यावर मी ठाम आहे, असेही श्री.केळकर यांनी स्पष्ट केले.
पहिल्या मजल्यावर प्राच्य विद्या तर दोन मजल्यांवरवर बहुद्देशीय सभागृह
हाजुरी येथे ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे यांच्या नावाने महापालिकेने तळ अधिक तीन मजली इमारत उभारली असून आजवर पहिल्या व दुस-या मजल्यावर प्राच्य विद्या संस्थेस जागा उपलब्ध करुन दिली आहे. सन 2014 मध्ये सदर संस्थेस शाहू मार्केट येथील इमारत धोकादायक झाल्याने श्रीनिवास खळे ग्रंथसंग्रहालयातील पहिला व दुसरा मजला उपलब्ध करुन देण्यात आला, परंतु याबाबत मा. महासभेची परवानगी घेतल्याची कोणतीही नोंद महापालिकेकडे नसल्याचे नगरसेवक विकास रेपाळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. सदर वास्तूमध्ये महापालिकेच्या नावाचा साधा उल्लेख करण्यात आलेला नसतानाही या संस्थेला दरवर्षी महापालिकेकडून पाच लाख रुपये देखील देण्यात येत आहेत. वास्ताविक पाहता सदरची इमारत महापालिकेने बांधलेली असताना देखील याकडे दुर्लक्ष होत आहे, तसेच विभागातील नागरिकांना या वास्तूचा कोणत्याही प्रकारे फायदा होत नाही. तसेच उपलब्ध जागेच्या फक्त 20 टक्के जागाच सदर संस्थेच्या मार्फत वापरली जात असून उर्वरित जागेचा काही वापर होत नसल्याची बाब देखील नगरसेवक विकास रेपाळे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. याबाबत गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभागृहाचे लक्ष वेधून या वास्तूतील केवळ तिसरा मजला हा प्राच्य विद्या संस्थेस द्यावा व उर्वरित दोन मजले विभागातील स्थानिक नागरिकांसाठी बहुउद्देशीय सभागृह म्हणून वापरण्यात यावे अशी सूचना स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे यांनी मांडली, याला सभागृहाने एकमताने मंजूरी दिली असून सदर प्रस्ताव मंजूर केल्याची घोषणा पीठासीन अधिकारी म्हणून महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी केली. यापुढे सदर वास्तूतील दोन मजले नागरिकांसाठी वापरण्यात येतील असेही महापौरांनी नमूद केले.