आता वारसांनाही घरासाठी करावा लागत आहे संघर्ष
ठाणे : महापालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बीएसयुपीच्या घरांच्या चाव्याचे वाटप करण्यात आले होते. महापालिकेत गेली २५ ते ३० वर्ष सत्ता असलेल्या शिवसेना पक्षाने प्रशासनाच्या माध्यमातून भव्य कार्यक्रम घेऊन दिव्यांगांना घराच्या चाव्या दिल्या होत्या. मात्र प्रशासकीय विलंबामुळे त्यांना अद्याप घराचा ताबा मिळाला नसून घरासाठीचा संघर्ष न संपल्याने सर्वसाधारण सभेत यावरून वातावरण तापले होते.
पालिकेने दिव्यांगांना दिलेल्या हक्काच्या बीएसयुपी घराची चावी राहुल मोरे नाव्याच्या दिव्यांग व्यक्तीलाही देण्यात आली. मात्र घर मिळण्याच्या आधीच मोरे यांना मृत्यूने गाठले. चावी वाटप झाल्यानंतर तात्काळ मोरे यांना घराचा ताबा मिळाला असता तर किमान एक वर्ष तरी त्यांना आपल्या हक्काच्या घरात राहता आला असते. प्रशासकीय विलंबामुळे त्यांना अद्याप घराचा ताबा मिळाला नाहीच मात्र मृत्यूनंतरही हा संघर्ष संपलेला नसून आता या घरासाठी त्याच्या कुटुंबियांना वारसा हक्क प्रमाणपत्र आणण्याचा फतवा ठाणे महापालिकेच्या वतीने काढण्यात आला आहे. यावरून गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मात्र वातावरण चांगलेच तापले होते .
ठाणे महापालिकेच्या वतीने विविध योजनांमधून दिव्यांगांना घराचे वाटप करण्यात येते. अशाच काही दिव्यांग व्यक्तींना बीएसयुपी योजनेच्या माध्यमातून तुळशीधाम या ठिकाणी घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले होते. कोव्हीडचे संक्रमण सुरु होण्याच्या आधी साधारणतः २०१९ च्या सुरुवातीला पालिकेच्या गडकरी रंगायतन नाट्यगृहात भव्य कार्यक्रम घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या चाव्यांचे वाटप करण्यात आले होते. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी हा गंभीर विषय सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला. ठाणे महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चाव्या वाटण्याचे काम केले मात्र संबंधित व्यक्तीला घर तर मिळाले नाहीच मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर कोव्हीडचा काळ सुरु झाल्याने या इमारती क्वारंटाईन सेंटरसाठी वापरण्यात आल्या असल्याने हा विलंब झाला असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. मात्र संबंधित व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याने वारसा प्रमाणपत्र सादर करण्याचा फतवा ठाणे महापालिकेने काढला असून त्यामुळे मयत कुटुंबियांच्या वारसांना देखिल आपल्या हक्कांच्या घरासाठी संघर्ष करावा लागत असल्याचे सर्वसाधारण सभेत उघड झाले आहे.
स्थावर मालमत्ता विभागाच्या कारभारावर ताशेरे
ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाच्या कारभारावर या सर्व प्रकारामुळे ताशेरे ओढण्यात आले. या विभागाकडून केवळ आश्वासनाच्या पलीकडे काहीच केले जात नसून नगरसेवकांना देखील हा विभाग जुमानत नसल्याचा आरोप यावेळी नगरसेवकांनी केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात टीका होऊनही या विभागाच्या अधिकाऱ्यांना मात्र पाठीशी घालण्याचे प्रकार सुरु असल्याचे सभागृहात पाहायला मिळाले.