महाविकास आघाडीचे कार्यकर्ते कळवा-विटाव्यातून भाजपात दाखल

शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा समावेश

ठाणे : ठाणे शहरात भाजपाला प्रतिसाद वाढता असून, शहरातील शिवसैनिकांपाठोपाठ कळवा-विटावा परिसरातील महाविकास आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाचे खासदार विनय सहस्रबुद्धे, आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

किसननगर, वर्तकनगर, घोडबंदर रोड पाठोपाठ कळवा-विटाव्यातील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला आहे. कॉंग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष अॅड. सुदर्शन साळवी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विटावा वॉर्ड अध्यक्ष जितेंद्र गवते आणि शिवसेनेचे कळवा-शिवाजीनगर येथील माजी शाखाप्रमुख सत्यवान राणे, कॉंग्रेसच्या ठाणे शहर सुशिक्षित बेरोजगार सेलचे अध्यक्ष हिरामण सुर्वे, कॉंग्रेसचे ब्लॉक कोषाध्यक्ष गिरीश निंबाळकर यांनी आज भाजपामध्ये शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश केला. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला भाजपाचे शहर सरचिटणीस विलास साठे, मनोहर सुखदरे आणि उपाध्यक्ष सुजय पतकी यांचीही उपस्थिती होती.

महाविकास आघाडी सरकारच्या दोन वर्षांतील कामगिरीमुळे निराशा झाली आहे. ठाणे शहराबरोबरच राज्यात कोणतेही ठोस काम झालेले नाही. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून भारतात नियोजनबद्धरित्या विकास केला जात आहे. सद्यस्थितीत राज्यातील जनतेला भाजपाकडून न्याय मिळेल, या भावनेने आम्ही भाजपामध्ये प्रवेश करीत आहोत, अशी प्रतिक्रिया भाजपामध्ये दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.