दाटीवाटीची बांधकामे वाचवण्यासाठी १० मीटरच्या रस्त्यांचा पर्याय

आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव महासभेच्या मंजुरीसाठी

ठाणे : घोडबंदर येथील ओवळा भागातील दाटीवाटीच्या रहिवास क्षेत्रातील बांधकामे वाचवण्यासाठी महापालिका विकास आराखड्यातील २० मीटर रुंदीचा रस्ता करण्याऐवजी १० मीटर रुंदीचे दोन पर्यायी रस्ते तयार करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका प्रशासनाने आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव तयार केला असून तो उद्या होणाऱ्या सर्वसाधारण महासभेपुढे अंतिम मान्यतेसाठी सादर केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरीकरण झाले आहे. वाढत्या नागरीकरणामुळे शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्या तुलनेत शहरातील रस्ते वाहतुकीसाठी अपुरे पडू लागले आहेत. त्यातच शहरात अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. यामुळे शहरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी महापालिका प्रशासनाने गेल्या काही वर्षांपूर्वी रस्ते रुंदीकरण याची माहिती घेतली असून या मोहिमेत त्यांनी शहरातील विविध रस्त्यांचे रुंदीकरण केले आहे. असे असतानाच महापालिका प्रशासनाने आता ओवळा भागातील विकास आराखड्यातील रस्ता विकसित करताना त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी रस्ते रुंदीकरणात बाधित होत असलेली बांधकामे पालिकेने हटवून त्यातील नागरिकांचे पुनर्वसन केले होते. परंतु ओवळा भागातील दाटीवाटीच्या क्षेत्रातील बांधकामे वाचवण्यासाठीच पालिकेने रस्त्याची रुंदी कमी करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रस्तावातून दिसून येत आहे.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील सेक्टर क्र. ६ मधील घोडबंदर रस्त्याच्या पूर्वेकडील बाजूस ओवळा गावामध्ये मंजूर विकास आराखड्यानुसार ४० मी आणि २० मीटरचे रस्ते दर्शविलेले आहेत. या रस्त्यापैकी काही रस्ते विकसित करण्यात आले आहेत. तर, ६० मीटर रुंद असलेला घोडबंदर रस्त्यापासून ते पुढे ओवळा गावात नियोजित २० मीटर रुंदीचा रस्ता दर्शविला आहे. घोडबंदर रस्त्याजवळील श्रीराम रुग्णालयापासून अंदाजे ४० मीटर अंतरावर अस्तित्वातील ९ मीटर रुंद रस्ता हा पुढे २० मीटर रस्त्याला जोडण्यात आला आहे. या रस्त्यापैकी दाटीवाटी क्षेत्रामध्ये असलेल्या रस्त्याच्या रुंदीमध्ये काही गावकऱ्यांची घरे आणि पुरातनकालीन मंदिराचे बांधकाम येत आहे. तसेच या परिसरात नियोजीत पर्यायी रस्ता उपलब्ध आहे. यामुळे नगरसेविका साधना जोशी यांच्या मागणीनुसार या रस्त्याच्या लांबीपैकी दाटीवाटी क्षेत्राच्या हद्दीमध्ये अंदाजे १९० मीटर लांबीमध्ये या रस्त्याची रुंदी कमी करुन १० मीटर रुंद रस्ता प्रस्तावित करताना प्रस्तावित १० मीटर रुंदीचा अंशतः भाग नियोजित रस्त्याबाहेर अस्तित्वातील रस्त्यात समावेश करण्यात येत आहे. तसेच या रस्त्यापासून अंदाजे ४० मीटर अंतरावर अस्तित्वातील ९ मीटर रुंद रस्त्याची रुंदी १० मीटर रुंद करण्याचे प्रस्तावित केले आहे.

काय आहे प्रस्ताव?

– नियोजीत २० मीटर रुंद रस्त्याच्या लांबीपैकी दाटीवाटी क्षेत्राच्या हद्दीपर्यंतचा रस्ता २० मीटर रुंदीऐवजी १० मीटर रुंदीचा प्रस्तावित करण्यात आला आहे. २० मीटर रुंदीपैकी उर्वरीत क्षेत्र रहिवास विभागात समावेश करणे. तसेच प्रस्तावित १० मीटर रस्त्याच्या रुंदीबाहेरील मंजूर विकास आराखडयानुसार २० मीटर रुंदीच्या आतील ठाणे महानगरपालिकेच्या नावे झालेल्या क्षेत्रावर म्युनिसिपल पर्पज असे आरक्षण मंजूर करून विकास योजनेमध्ये दर्शविणे.

– ६० मीटर रुंद घोडबंदर रस्त्यापासून ते श्रीराम हॉस्पिटल ते बगीचा आरक्षण क्र. २ लगत नियोजीत २० मीटर रुंद रस्त्यापर्यंत अस्तित्वातील रस्त्याचे रुंदीकरण प्रस्तावित करून १० मीटर रुंद नियोजीत रस्ता मंजूर विकास योजनेमध्ये दर्शविणे.