युक्रेनच्या मदतीला न्यूझीलंड गेला धावून; संसदेवर युक्रेनचा झेंडा फडकवला

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान युक्रेनियन लोकांना समर्थन म्हणून वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंडच्या संसदेवर युक्रेनचा ध्वज फडकवण्यात आला. केवळ पाठिंबाच नव्हे तर न्यूझीलंडने स्थानिक आरोग्य संस्थांना तसेच अन्न आणि स्वच्छता यासारख्या मूलभूत गरजांसाठी युक्रेनला २ दशलक्ष डॉलर्सची मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.

युक्रेनच्या नागरिकांच्या मानवतावादी सहाय्यासाठी बाजूला ठेवलेल्या निधीची घोषणा करताना, परराष्ट्र मंत्री नानाया माहुता यांनी देखील रशियाला युक्रेनमधील लष्करी कारवाया थांबवण्याचे आवाहन केले. माहुता म्हणाले, “या संघर्षातून मृत्यू आणि जखमींच्या वाढत्या संख्येच्या बातम्या ऐकून खूप अस्वस्थ होत आहे. युक्रेनमधील विस्थापित किंवा पीडित नागरिकांचे वेदनादायक आणि भयानक फोटो रशियाच्या अप्रत्यक्ष आक्रमणाचे परिणाम अधोरेखित करतात.”

माहुता यांच्या म्हणण्यानुसार, रशियाने आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार नागरिकांच्या संरक्षणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या पाहिजेत, तसेच संकट कमी करण्यासाठी राजनैतिक चर्चेकडे परतावे. शिवाय, युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा बदला म्हणून, न्यूझीलंडने राजनैतिक संबंध मर्यादित करणे आणि रशियन अधिकाऱ्यांवर प्रवास निर्बंध घालणे यासह विविध कृती केल्या आहेत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जॅसिंडा आर्डर्न आणि परराष्ट्र मंत्री नानाया माहुता यांनी रशियाचा निषेध करणारे संयुक्त निवेदन जारी केले आणि युक्रेनमधील लष्करी कारवाई थांबवण्याची मागणी केली.