सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले मत
ठाणे : संघाचे स्वयंसेवक आजच्या घडीला मोठ्या प्रमाणात बँकेच्या कामात येत आहेत. कारण त्यांनी बँकिंग क्षेत्राकडे काम म्हणून नाही तर, सेवा म्हणून पाहिले असल्याचे मत सरसंघ चालक डॉ. मोहन भागवत यांनी ठाण्यात व्यक्त केले. ठाणे जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
ठाणे जनता सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचा सांगता कार्यक्रम शुक्रवारी ठाण्यातील टिप-टॉप प्लाझा सभागृहात पार पडला. यावेळी या कार्यक्रमास बँकेचे अध्यक्ष विवेकानंद पत्की, उपाध्यक्ष शरद गांगल आणि टीजेएसबी सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील साठे उपस्थित होते. तसेच बँकेचे माजी अध्यक्ष कृष्णा केळकर, गंगधार साठे, मधुकर बापट, भालचंद्र दाते, सदाशिव जोशी, विद्याधर वैशंपायन, नंदगोपाल मेनन या सर्वांचा मोहन भागवत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. बँकेच्या ५० वर्षातील कार्याचा आढावा घेणाऱ्या स्मरणिकेचे आणि कॉफी टेबल पुस्तकाचे यावेळी प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बोलताना, डॉ मोहन भागवत यांनी सांगितले कि, मी जनावरांचा डॉक्टर आहे. सरकारी नोकरीचे तेरा महिने सोडले तर एकही पैसा कमवला नाही. पण 50 वर्षे चालणाऱ्या बँकेच्या कार्यक्रमात मला बोलावलं आहे. संघ विचारांची प्रेरणा या बँकेच्या विकासामध्ये आहे. प्रत्येक गोष्ट करताना कुटुंब भावना आपल्या मनात असावी लागते असेही ते म्हणाले. अर्थ शक्तीसाठी सहकार हा उपाय आहे. ती सर्वसामान्य माणसांच्या हातात यावी त्यामुळे सहकार क्षेत्र निवडले. आर्थिक उलाढाल ही समाज चालावं म्हणून करावी. सहकार हे अर्थशास्त्राला धर्मसाधनेत वळविणारे साधन आहे. एखादी बँक 50 वर्षे सुरळीत चालवणे कठीण आहे. पण ती चालवून सतत फायद्यात ठेवायची. ती ठेवताना मूळ उद्देशाला छेद न देता काम करणे हे अजूनच कठीण असल्याचे देखील भागवत यांनी यावेळी सांगितले. आपण ज्याकडे चालतो त्याकडे लक्ष द्यावे लागते. अत्यंत कठीण परिस्थितीत काम केल्याने यश मिळते. काळ कसा आहे? मित्र कोण आहे? माझी शक्ती कोण? याचे चिंतन करावे. परिश्रमाने जे धारण करतो त्याला श्रद्धा म्हणतात. जर तुम्हांला तुमच्या ध्येयाचा विसर झाला नाही तर यश नक्की मिळणार. तसेच सहकार भारतात खूप जुना असून सहकार हा भारतीयांच्या रक्तात असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, टीजेएसबी बँकेच्या कार्याचे मोहन भागवत यांनी कौतुकही केले. गेल्या ५० वर्षात आपण अनेक चढ-उतार पाहिले असतील. परंतु आपला संपुर्ण समाज समर्थ व्हावा आणि प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र असल्याचा अनुभव यावा आणि सगळ्यांनी मिळून देश बलवान करावा, अशा एका भावनेने तो भारीत व्हावा. यासाठी आणखीन काही दशके काम करावे लागेल. त्यात आणखी चढ-उतार पहायला मिळतील. परंतु ज्या उद्देशातून वसा हाती घेतला आहे. तो वसा घेऊन पुढे चालत रहा, असा सल्ला त्यांनी बँकेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी दिला. तुमच्या उद्देशाचे विस्मरण तुम्हाला झाले नाही तर तुमचे भाग्य तुम्हाला कधीही सोडणार नाही. शीड उभारा, बंधन तोडा, नावेला सागरात ढकलून द्या आणि दिशा न बदलत तुम्ही सतत वल्हवाच्या तयारीत असाल तर तुमचे भाग्य तुमच्याशी जुगार खेळणार नाही, असेही शेवटी श्री भागवत म्हणाले.