युद्धाच्या ढगात झाकोळून गेला युक्रेन; ठाणेकर मंगेश कोळी सुरक्षित परतले

ठाणे (आनंद कांबळे) ; रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू होण्यापूर्वीच युक्रेनहून एक दिवस आधी आलेले ठाणेकर मंगेश कोळी यांचा जीव भांड्यात पडला आहे. ठाण्यात येताच त्यांनी ठाणेवैभवशी केलेली बातचीत.

तुम्ही युक्रेन येथे केव्हा गेला होतात? त्यावेळी तेथील परिस्थिती कशी होती? सध्या काय स्थिती आहे?

मागील आठवड्यात युक्रेनची राजधानी किव्ह येथे गेलो होतो.  त्यावेळी तेथील स्थिती सामान्य होती. थोडा तणाव होता परंतु रशिया हल्ला करेल असे कोणालाही वाटले नव्हते. तीन दिवसांपूर्वी युक्रेन येथील सर्व मॉल, सिनेमागृह, हॉटेल, शाळा, महाविद्यालये सुरू होती. फक्त रशियाच्या विरोधात तेथील नागरिक निषेधाच्या सभा घेत होते. परंतु रशियाने अचानक हल्ले सुरू केले. सध्या तेथील परिस्थिती अतिशय भयानक आहे.  देशातील सहा विमानतळावर रशियाने हल्ला करून ते नेस्तनाबूत केले आहेत.  सर्व व्यवहार ठप्प झाले असून अनेकांना बँकरमध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.

तुम्ही कसे आलात? तुमच्याबरोबर किती जण आले? सध्या किती भारतीय युक्रेनमध्ये अडकले आहेत?

मी बुधवारी भारतात आलो. दहा – दहा मिनिटाच्या अंतराने सहा विमाने भारतातील दिल्ली विमानतळावर उतरली. या विमानातून हजार- दीड हजार भारतीय आले आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी होते. आम्ही दिल्ली विमानतळावर पोहचलो त्याचवेळी किव्ह विमानतळावर हल्ला करून ते नेस्तनाबूत करण्यात आले. त्यामुळे तेथून भारतात किंवा इतर देशात परतीचे मार्ग बंद झाल्याने अनेकांनी रस्तामार्गे युक्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पोलंड, हंगेरी, युगेस्लेव्हिया या देशाकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे ६० ते ७० किलोमीटर इतक्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. युक्रेनमध्ये सध्या १८ हजार पेक्षा जास्त भारतीय आहेत. त्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी आहेत.  या विद्यार्थ्यांना सध्या बँकरमध्ये  ठेवण्यात आले आहे.  परंतु युक्रेनमध्ये कड्याक्याची थंडी आहे.  तापमान १ ते २ डिग्री इतके आहे. त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत.

हे युद्ध आणखी काही दिवस सुरू राहिले  तर काय परिस्थिती उद्भवेल?

युद्ध असेच सुरू राहिले  तर पाणी आणि अन्न- धान्याचा प्रश्न निर्माण होईल.  भारतीय विद्यार्थ्यांना त्याचा सामना करावा लागेल.  येथील मॉल, बँक, एटीएम सर्व बंद पडले आहेत. दळणवळणाची साधने उपलब्ध होणार नाहीत. त्यामुळे भारतीय विद्यार्थी आणि भारतीय कामगारांचे हाल होतील अशी भीती वाटते.

एकंदरीत परिस्थितीचा विचार करता भारत सरकारने काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते?

युक्रेन आणि रशिया येथे शिक्षणाकरिता गेलेल्या हजारो विद्यार्थ्यांना पोलंडमार्गे भारतात आणण्याची सोय करावी. या विद्यार्थ्यांना आणि इतर भारतीयांना मायदेशात सुखरूप परत आणण्यासाठी विशेष विमाने पाठवावीत.

युक्रेन येथे आजची परिस्थिती कशी आहे?

रशियाने सर्व विमानतळे उद्धवस्त केली आहेत. खरवी शहर बेचिराख केले आहे.  आज दुपारी २ वाजेपर्यंत युक्रेनची राजधानी किव्हच्या दिशेने रशियन सैन्याने आगेकूच केली होती.  पुढील एक ते दोन दिवसात रशियन सैन्य किव्ह शहराचा ताबा घेऊ शकते अशी शक्यता आहे.