ठाणे: येत्या १ मार्च रोजी महाशिवरात्री असल्याने ठाण्यातील जांभळी नाक्यापासून सुभाषपथ मार्गे मुख्य बाजारपेठेतील ए वन फर्निचरकडे जाणारा रस्ता सर्वच वाहनांसाठी पहाटे ४ ते रात्री १२ वाजेपर्यंत बंद केल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारपेठेतील कौपिनेश्वर मंदिर याठिकाणी महाशिवरात्री उत्सव साजरा होणार आहे. याठिकाणी मोठया प्रमाणात भाविकांची दर्शनासाठी गर्दी होण्याची शक्यता असते. त्यामुळे या परिसरातील नागरीकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि जनतेची गैरसोय होऊ नये, यासाठी जांभळी नाका ते ए वन फर्निचरकडे जाणा:या मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांना जांभळी नाका येथे प्रवेश बंद राहणार आहे. त्या मार्गाऐवजी ही वाहने जांभळी नाका येथून उजवीकडे वळण घेऊन टॉवरनाकामार्गे जातील, असे वाहतूक नियंत्रण शाखेने काढलेल्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे. ही अधिसूचना पोलीस, अग्निशमन दल, रुग्णवाहिका तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी लागू राहणार नसल्याचेही वाहतूक नियंत्रण शाखेने म्हटले आहे.