बारावी परीक्षेच्या वेळापत्रकामध्ये अंशतः बदल; मराठी आणि हिंदीचा पेपर पुढे ढकलला

मुंबई – बारावी परीक्षेच्या (HSC Board Exam) वेळापत्रकामध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीचे ५ आणि ७ मार्च रोजी होणारे पेपर आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहेत. वेळापत्रकातील दोन पेपरमध्ये हा बदल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी बोर्डाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार बारावीच्या परीक्षा ४ मार्चपासून सुरू होणार आहेत. मात्र आता वेळापत्रकामध्ये अंशत: बदल करण्यात आला असून बारावीचे ५ आणि ७ मार्चला होणारे पेपर हे आता ५ आणि ७ एप्रिलला घेण्यात येणार आहेत. ५ मार्च रोजी होणारा हिंदीचा पेपर आता ५ एप्रिलला होणार आहे. तर सात मार्चला होणारा मराठीचा पेपर हा सात एप्रिल रोजी घेण्यात येणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या एका टेम्पोला पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्याजवळ आग लागली होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावी बारावीच्या पुणे बोर्डाच्या प्रश्नपत्रिका घेऊन जाणाऱ्या टेम्पोला चंदनापुरी घाटात मागच्या बाजूने ही आग लागली. या आगीमध्ये संपूर्ण प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या. परीक्षा तोंडावर असताना प्रश्नपत्रिका जळाल्याने या दोन पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे आणि वेळापत्रकात अंशतः बदल करण्यात आला आहे. ५ आणि ७ मार्च रोजी जे पेपर होते त्यातील काही प्रश्नपत्रिका जळून खाक झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने बैठक घेऊन या दोन विषयाचे पेपर पुढे ढकलले आहेत.

परीक्षा ठरल्याप्रमाणे ऑफलाईनच

दहावी (SSC Board) आणि बारावीच्या (HSC Board) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहेत. राज्य शिक्षण मंत्रिमंडळाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मागील अनेक महिन्यांपासून दहावी, बारावीच्या परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन होणार यावर संभ्रम कायम होता. मात्र, आता हा संभ्रम दूर झाला असून परीक्षा ऑफलाईनच होणार आहेत.