मराठी शाळा पाडली; शिक्षण सुरू झाडाखाली

* मुंबई महापालिकेची भिवंडीत कारवाई
* पर्यायी व्यवस्था नसल्याने शिक्षणाचे तीन-तेरा

भिवंडी : भिवंडी तालुक्यातील धामणगाव येथे तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून सुरू असलेली मराठी शाळा पालिकेच्या जलअभियंत्याने धोकादायक ठरवून जमीनदोस्त केली. परंतु विद्यार्थ्यांना पर्यायी शाळेची व्यवस्था न केल्याने मुंबई मनपा प्रशासनाने त्यांच्या शिक्षणाचे तीन तेरा वाजवले आहेत.

एकीकडे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी प्रयत्न करीत असतानाच त्यांच्याच पक्षाची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेने मराठी शाळा बंद करण्याचा जणू चंगच बांधलेला दिसत आहे. मराठी भाषा दिनाच्या तीन दिवस आधीच मराठी शाळेतील विद्यार्थी हे मंदिराच्या व पडक्या इमारतीच्या आवारात तसेच पटांगणातील झाडाखाली शिक्षण घेत असल्याची स्थिती भिवंडी तालुक्यातील धामणगाव ह्या प्रकल्पग्रस्तांसाठी बांधलेल्या मनपाच्या शाळेत दिसून येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने पिसे पांजरापुर येथील गोडाऊन शाळेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून देण्यात आली होती. परंतु त्या गोडाऊनला लागूनच पालिकेचा डिझेल पंप व ऑइल प्लांट असल्याने विद्यार्थ्यांसाठी सदरील जागा अतिधोकादायक होती, म्हणून या पर्यायी व्यवस्थेला पालकांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यानंतर पालिकेने शाळेला दिलेली पर्यायी जागा आधीच्या शाळेपासून सहा किमी लांब अंतरावर असल्याने विद्यार्थी पालकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. त्यामुळे या कारणाने विरोध झाला. ह्या शाळेत शिकणारे बहुसंख्य विद्यार्थी हे आदिवासी असल्याने त्यांच्या पालकांना हे परवडण्याजोगे नाही. त्यामुळे मुलाच्या शाळेची पर्यायी सुविधा झाली नाही. संबंधित विषयाची तक्रार मनसेकडे आली असता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष परेश चौधरी त्यांचे सह पदाधिकारी ऍड. सुनील देवरे,पि.के.पाटील, भावेश पाटील  यांनी शाळेची भेट घेत विद्यार्थी पालकांच्या वतीने कार्यकारी अभियंता यांना पत्र देत विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात यावे व त्यांच्यासाठी शाळेच्या नवीन इमारतीची पर्यायी व्यवस्था जवळपास करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

मराठी शाळा वाचवण्यासाठी आणि मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मनसे कटिबद्ध आहे. आधीच कोरोना काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडला आहे. त्यात मुंबई महापालिकेने कारवाई करून शिक्षणाचाच खेळ खंडोबा केला आहे. पालिकेने तत्काळ या विद्यार्थ्यांची योग्य पर्यायी व्यवस्था करावी, अन्यथा मनसे स्टाईल आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे.