महापौरांच्या हस्ते झाले उदघाटन
ठाणे : कासारवडवली, घोडबंदर रोडवरील वाढत्या नागरीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असणाऱ्या ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.१ मधील ओवळा-आनंदनगर येथे नव्याने बांधण्यात आलेल्या अग्निशमन केंद्राचे उदघाटन आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झाले.
या परिसरात एखादी दुर्घटना घडल्यास ओवळा अग्निशमन केंद्रामुळे निश्चितच कमी कालावधीत दुर्घटनास्थळी पोहचणे शक्य होणार असून सुरक्षेतेच्या दृष्टीने याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे प्रतिपादन महापौर नरेश म्हस्के यांनी या उदघाटन प्रसंगी केले. या उदघाटन सोहळ्यास उप महापौर पल्लवी कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, स्थानिक नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्र.1 अंतर्गत आनंदनगर, कासारवडवली घोडबंदर येथे नव्याने अग्निशमन केंद्र बांधण्यात आले आहे. या अग्निशमन केंद्रात तळ अधिक २ मजली सुसज्य इमारत असून यामध्ये नियंत्रण कक्ष, स्टोअर रूम, प्रसाधनगृह, अधिकारी कक्ष, मिटिंग रूम, कॉन्फरन्स रूम आदी सुविधांचा समावेश आहे. घोडबंदर रोडवरील नागरीकरण झपाट्याने वाढत असून या विभागात काही दुर्घटना घडल्यास बाळकूम, नितिन जंक्शन, वागळे व जवाहरबाग येथून अग्निशमन गाडी पोहचण्यास उशीर होत होता. परंतु आनंदनगर येथील या अग्निशमन केंद्रामुळे निश्चितच कमी कालावधीत दुर्घटनास्थळी पोहचणे शक्य होणार आहे.