ठेकेदारांच्या आडमुठेपणामुळे मेट्रोचे काम तीन महिने रखडले

खासदार राजन विचारे यांची एमएमआरडीए आयुक्तांशी चर्चा

ठाणे : मेट्रो मार्ग क्रमांक ४ च्या वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे -कासारवडवली व मेट्रो मार्ग क्रमांक ४-ए कासारवडवली ते गायमुख या दोन्ही मेट्रो मार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांची भेट घेतली. या भेटीत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार या मार्गावरील काही ठिकाणचे काम गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. हे काम तत्काळ सुरू करण्याची विनंती खासदार राजन विचारे यांनी एमएमआरडीए आयुक्तांकडे केली.

ठाण्यातील मेट्रो मार्ग क्रमांक ४ मधील पॅकेज क्रमांक ८, १० व १२ मधील मार्गावर दोन ठेकेदारांच्या आडमुठ्या धोरणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या मेट्रो मार्गाचे काम बंद आहे. त्यामुळे या मार्गावर लावलेल्या बॅरिकेट्समुळे पॅकेज क्रमांक १२ कापूरबावडी ते कासारवडवली या अरुंद रस्त्यावरून घोडबंदरमधील रहिवाशांना वाहतूक कोंडीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या त्रासामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत नुकताच खासदार राजन विचारे यांनी एमएमआरडीए आयुक्त श्रीनिवास यांची भेट घेऊन हा तिढा सोडवून याचे काम लवकरात लवकर सुरू करावे अशी विनंती पत्राद्वारे करण्यात आली आहे.

मुलुंड ते माजिवडे या मार्गावर मुलुंड फायर स्टेशन, मुलुंड नाका स्टेशन, तीन हात नाका, आरटीओ ठाणे, महापालिका मार्ग, कॅडबरी जंक्शन, माजिवडे अशी स्थानके असून ६१.०८ टक्के काम झाले आहे. कापूरबावडी ते कासारवडवली या मार्गावर कापूरबावडी, मानपाडा, टिकुजीनी वाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली अशी स्थानके असून अवघे १९.४६ टक्के काम झाले आहे. कासारवडवली ते गायमुख या मार्गावर गोवनी पाडा आणि गायमुख अशी स्थानके असून २६.१४ टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती श्री. विचारे यांनी दिली.