ठाणे : मीरा-भाईंदरला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला ट्रकने धडक दिल्यामुळे जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेल्याची घटना माजिवडे नाका येथे घडली.
स्टेम प्राधिकरणातून मीरा-भाईंदर महापालिकेला पाणी पुरवठा केला जातो. आज दुपारी १२.१५च्या दरम्यान माजिवडे पेट्रोल पंप येथे या जलवाहिनीवर बसविण्यात आलेल्या व्हॉल्वला एका ट्रकने धडक दिली. त्यामध्ये १३३० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे फवारे सुमारे २५ ते ३० फूट उंचीवर उडत होते.
या घटनेची माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळविण्यात आल्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पाणीपुरवठा बंद केले, त्यामुळे मीरा भाईंदर येथील पाणी पुरवठा सुमारे आठ तास बंद ठेवण्यात आला. रात्री उशिरापर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते.