शिवसेनेने दिला प्रशासनाला आंदोलनाचा इशारा
अंबरनाथ : उड्डाणपूल झाले, रस्ते सिमेंटचे झाले, पे अँड पार्किंगच्या सुविधा झाल्या, नाट्यगृहाचे काम सुरु आहे. अशा आधुनिक सुविधा पुरवल्या मात्र अंबरनाथमधील वाहतूक कोंडीची समस्या भेडसावत असून नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. शहरातील रस्त्याच्या दुर्तफा होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावा अन्यथा राज्यात सत्तेमध्ये असलो तरीही नाईलाजाने आंदोलन करावे लागेल असा इशारा शिवसेनेच्या वतीने पालिका प्रशासन आणि पोलीस यंत्रणेला देण्यात आला.
अंबरनाथला स्टेशन परिसरासह पूर्ण शहरात रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येवरून शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी पुढाकार घेऊन कोंडी फोडण्याच्या दृष्टीने मार्ग निघावा यासाठी नगरपालिकेमध्ये बैठकीचे आयोजन केले होते. नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, वाहतूक विभागाचे निरीक्षक सुखदेव पाटील, शिवाजीनगर पोलीस निरीक्षक मधुकर भोगे, माजी नगराध्यक्ष विजय पवार, महिला आघाडी आणि पदाधिकारी, रिक्षा संघटनेचे अध्यक्ष मिलिंद पाटील, यांच्यासह नगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे संदीप कांबळे, नरेंद्र संख्ये तसेच विविध खात्यांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावतीने शिवसेनेच्या माध्यमातून अंबरनाथवासियांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तरीही स्टेशन परिसरातून फेरीवाले आणि रिक्षांच्या रागांतून नागरिकांना पायी चालणे कठीण झाले असून महिलांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होत आहे. आगीच्या घटना घडल्यास अग्निशमन दलाच्या वाहनांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. मुख्य मार्गावर दुकानदार, फेरीवाले रस्ते पदपथ अडवतात. वापरात नसणाऱ्या हातगाड्या रस्त्याच्या कडेला वर्षानुवर्षे धूळखात पडून असतात. आदी बाबींवर पालिका आणि पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अन्यथा राज्यात सत्तेवर असलो तरी नागरिकांच्या हितासाठी आंदोलन केले जाईल, अशा शब्दात शहरप्रमुख वाळेकर यांनी यंत्रणांना ठणकावले. शहराच्या प्रत्येक भागात नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे यावेळी निदर्शनाला आणून देण्यात आले.
अतिक्रमणे हटवताना पोलीस प्रशासनाचे सहकार्य मिळत नसल्याची तक्रार पालिका अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. यावरून अधिकाऱ्यांनी बंदोबस्त मागताच बंदोबस्त पुरवण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आल्याने आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पहावयाला मिळाले.
स्थानक परिसरात गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी बी-केबिन परिसरात असलेला रिक्षा स्टॅण्ड काही अंतरावर न्यावा, वडवली येथील रस्त्यावर उभ्या राहणाऱ्या रिक्षांचा स्टॅन्ड तात्पुरता पालिकेच्या मोकळ्या जागेत स्थलांतरित करून त्यांना शिस्त लावणे, मुख्य मार्गावर वॉर्डनची नेमूणक करून वाहतूक नियमन करणे, खासगी भूखंड ताब्यात घेऊन त्यावर वाहन पार्किंगची सोय करावी, पालिका अतिक्रमण विरोधी पथकाचे अधिकारी आणि पोलीस यांनी एकत्रितपणे काम केल्यास वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होऊ शकेल. प्रयत्न केल्यास समस्या मार्गी लागतील, असा विश्वास शहरप्रमुख वाळेकर यांनी व्यक्त केला.
शहरातील वाहतूक कोंडी समस्या दूर करण्यासाठी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांबरोबर लवकरच चर्चा करून समस्या दूर करू, असे प्रतिपादन पालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी केले.