बदलापूर : प्लास्टिकच्या जारमध्ये तोंड अडकून पडलेल्या बिबट्याच्या बछड्यावर पकडल्यानंतर त्याकग्यावर वैद्यकीय उपचार करून पुन्हा जंगलात सोडण्यात आले. तोंड अडकले होते,त्या बिबट्याला पकडून वन विभागाने चार दिवस त्याच्यावर उपचार केले. त्या बिबट्याची प्रकृती स्थिर झाल्यावर वन विभागाने शनिवारी त्या बिबट्याची पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुखरूप सुटका केली.
बदलापूरातील गोरेगाव परिसरात बिबट्याच्या बछड्याचे डोक्यात प्लास्टिकचा जार अडकल्याने त्याचा जीव धोक्यात आला होता. 13 फेब्रुवारी रोजी हा प्रकार स्थानिक रहिवाशांच्या लक्षात आला होता. त्यानंतर त्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. प्लास्टिकच्या जारमध्ये तोंड अडकल्याने या बिबट्याला काहीही खाणे किंवा पाणी पिणे देखील शक्य नव्हते. अशा परिस्थितीत या बिबट्याचा जीव धोक्यात आल्याची बाब लक्षात येताच 14 फेब्रुवारी आणि 15 फेब्रुवारी रोजी स्थानिक वन अधिकारी आणि प्राणी मित्रांनी सर्च ऑपरेशन सुरू केले. गोरेगावच्या जंगल पट्ट्यामध्ये बिबट्याला शोधण्यासाठी स्थानिक आदिवासींची देखील मदत घेण्यात आली.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला बेशुद्ध करून त्याच्या डोक्यात अडकलेला पाण्याचा जार काढला आणि त्याला वैद्यकीय उपचारासाठी मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आले. चार दिवस त्याच्यावर उपचार झाल्यानंतर या बिबट्याची प्रकृती स्थिर झाली असून त्याला शनिवारी रात्री वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या नैसर्गिक अधिवासात पुन्हा सोडले आहे.
पर्यटकांनी जंगल परिसरामध्ये प्लॅस्टिकच्या बाटल्या किंवा प्लॅस्टिकचे जार फेकू नये असे आवाहन प्राणीमित्र नीलेश भणगे यांनी केले आहे. दरम्यान बदलापूर आणि अंबरनाथ परिसरातील जंगल भागात बिबट्यांची संख्या वाढीसाठी अनुकूल वातावरण आहे. ज्या अर्थी बदलापूरच्या जंगलात बिबट्याचा बछडा आढळला आहे. त्या अर्थी त्याठिकाणी आणखीन काही बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.