अफान कुट्टी याला महापौरांकडून कौतुकाची थाप
ठाणे : डोळ्याला पट्टी बांधून काही मिनिटांतच ठाण्याचे प्रथम नागरिक महापौर नरेश म्हस्के यांचे चित्र, ठाणे महानगरपालिकेचे बोधचिन्ह आज महापौर दालनात एका 16 वर्षीय मुलाने काही क्षणात साकारले… आणि हे सारं पाहून महापौर सुद्धा भारावले.
रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून चित्र साकारणाऱ्या या अवलियाचे नाव आहे अफान कुट्टी. त्याच्या या कलेला दाद देत महापौरांनी त्याचे कौतुक करुन त्याचा गौरव केला. यावेळी उपमहापौर पल्लवी कदम, नगरसेवक बाबाजी पाटील उपस्थित होते. अफान कुट्टी हा 16 वर्षीय तरूण. मुंब्र्यातील काळसेकर महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तीन वर्षापासून अफान स्वत:च ही कला शिकल्याचे सांगतो. आजवर त्यांनी अनेक ठिकाणी रुबिक्सच्या माध्यमातून नावे तयार केली आहेत. तसेच जवळच्या व्यक्तींची, नातेवाईकांची चित्रेही साकारली आहे. आज ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे चित्र त्यांनी अवघ्या आठ मिनिटांत तर ठाणे महापालिकेचे बोधचिन्ह सात मिनिटांत रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून साकारले.
अफान कुट्टी याच्या कलेबद्दल त्याचे वडील बिजू कुट्टी यांना विचारले असता, ते म्हणाले, अफान 13 वर्षाचा असताना त्याला मोबाईलचे प्रचंड वेड लागले होते,रात्रंदिवस सतत तो मोबाईलवर पब्जीसारखे गेम खेळायचा, अतिमोबाईल सेवनामुळे त्याला जाड भिंगाचा चष्मा लागला. आजूबाजूचे लोक त्याला चिडवू लागले. त्याला मोबाईलपासून वेगळे करण्यासाठी वडिलांनी त्याला रुबिक्स आणून दिले आणि ते जोडून त्यापासून सुरूवातील व्यक्तींची नावे तयार करणे, नंतर हळू हळू घरातल्यांची चित्र तयार करण्यास सांगितले. काही दिवसांतच तो रुबिक्स क्यूबच्या माध्यमातून नावे व चित्र काही मिनिटात तयार करु लागला आणि आता त्यात तो पारंगत असल्याचे बिजू कुट्टी यांनी सांगितले. मोबाईलच्या अतिवापरामुळे किती नुकसान होते याचे धडेही तो सध्या तरूणांना देत आहे. मोबाईल वापरा पण त्याचा अतिवापर करु नका हा संदेश तो सध्या सर्वत्र पोहोचवित आहे. तसेच रुबिक्स क्यूब ही कला सुद्धा तो इतरांपर्यत पोहचविण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याच्या या कलेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, तसेच मल्टिपल एशिया बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. त्याची ही कला संपूर्ण जगभर पसरविण्याचा त्याचा मानस असल्याचे त्यांनी नमूद केले.