नव्या मार्गिकांमुळे रेल्वे प्रवास झाला वेगवान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पाचव्या-सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण

ठाणे : ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेमुळे अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला अधिक गती येईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला तर पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’स्वप्न पूर्ण झाल्याची भावना राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केली.

दूरदृष्यप्रणालीद्वारे पंतप्रधान श्री. मोदी यांच्या हस्ते आज ठाणे आणि दिवा दरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे लोकार्पण आणि उपनगरीय नवीन रेल्वेसेवांचा शुभारंभ झाला. यावेळी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री श्री.ठाकरे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून उपस्थित होते.

ठाणे रेल्वे स्थानक येथे झालेल्या सोहळ्यात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील, खासदार राजन विचारे, डॉ.श्रीकांत शिंदे, विनय सहस्त्रबुध्दे, मनोज कोटक, आमदार संजय केळकर, प्रमोद पाटील, निरंजन डावखरे, महापौर नरेश म्हस्के, रेल्वे बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.के.त्रिपाठी, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदि मान्यवर उपस्थित होते.

मध्य रेल्वेमार्गावर ३६ नवीन लोकल

अथकपणे धावणाऱ्या मुंबईकरांच्या जीवनाला गती देण्यासाठी रेल्वेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. या नवीन मार्गीकांमुळे लोकल आणि एक्सप्रेस गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गीका असतील. या दोन्ही मार्गीकांसोबतच मध्य रेल्वेच्या मार्गावर आजपासून ३६ नवीन लोकल सुरु होणार असून त्यामध्ये वातानुकुलित लोकलचा समावेश असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

मुंबई उपनगरीय सेवेला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून सुमारे ४०० कि.मी. लांबीची अतिरिक्त मार्गिका उपनगरीय रेल्वे सेवांसाठी वाढतील असे प्रयत्न असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. भारतीय रेल्वेला आधुनिक करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून कोरोना काळात गेल्या दोन वर्षात माल वाहतूकीमध्ये रेल्वेनी विक्रमी कामगिरी केली आहे. कोरोना काळत किसान रेल्वेच्या माध्यमातून देशातील शेतकऱ्यांना बाजारपेठांशी जोडण्याचे काम करण्यात आले. आगामी वर्षभरात ४०० नवीन वंदे भारत रेल्वे सेवा सुरु करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

‘दिवा’स्वप्न पूर्ण झाले- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मुंबईत ज्या सेवेची सुरुवात होते. त्याचं जाळ देशभर पसरतं. मुंबईवरुन सुरुवातीला ठाणे पर्यंत रेल्वे सेवा सुरु झाली आणि त्याचा विस्तार देशभर झाला. काल नवी मुंबईतून देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचा शुभारंभ झाला. ठाणे दिवा दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेचे काम करताना अडचणींचा सामना करीत राज्य आणि केंद्र शासनाच्या समन्वयातून हा प्रकल्प पूर्ण झाल्याचे सांगत एका अर्थाने ‘दिवा’ स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या नवीन मार्गीकांमुळे लाखो बांधवांना फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वर्षभरात साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ- केंद्रीय रेल्वे मंत्री

पाचव्या आणि सहाव्या मार्गीकेमुळे एका वर्षात सुमारे साडे तीन कोटी प्रवाशांना लाभ होईल असे रेल्वेमंत्री श्री. वैष्णव यांनी सांगितले. रेल्वे सेवेचे उन्नतीकरण करतानाच नवीन स्थानकांचे निर्माण देखील केले जात आहे. हे नवीन स्थानक देशातील शहरांचे आर्थिक जीवन वाहिनी बनत असल्याची भावना रेल्वे मंत्र्यांनी व्यक्त केली. यावेळी रेल्वे मंत्र्यांनी तत्कालीन दिवगंत खासदार रामभाऊ म्हाळगी आणि राम कापसे यांच्या कार्याचा उल्लेख करीत त्यांना श्रध्दांजली अर्पण केली.

पालकमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले, नव्या मार्गीकांमुळे रेल्वेच्या फेऱ्यांमध्ये वाढ होणार असून ठाणे, दिवा, कल्याण या गर्दीच्या स्थानकांना त्यांचा फायदा होईल. ठाणे रेल्वे स्थानक १६५ वर्ष जुने असून त्याचे पुर्नविकास होणे गरजेचे असल्याचे श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले. कळवा-ऐरोली उन्नतमार्ग प्रकल्पाचे काम करताना त्या भागातील नागरिक विस्थापित होणार नाहीत याची दक्षता घेतानाच केंद्र आणि राज्य सरकार मिळून त्यांचे पुनर्वसन केले जाईल अशी ग्वाही श्री.शिंदे यांनी दिली.

केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नव्या मार्गीकेमुळे केवळ रेल्वे सेवांचीच नव्हे तर मुंबई महानगर परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनाला गती मिळेल अशी आशा व्यक्त केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, राजन विचारे यांनी मनोगत व्यक्त केले. रेल्वे राज्यमंत्री श्री.दानवे यांनी आभार मानले.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्या – खा. राजन विचारे

खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकात उपस्थित असलेले केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन पत्राद्वारे निवेदन दिले.

खा. राजन विचारे भाषणात म्हणाले, ऐरोली-कळवा एलिव्हेटेड मार्गातील दिघा स्थानकाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील मार्गीकेचे काम लवकर सुरु करण्यासाठी १२०० लोकांचे पुनर्वसन एमएमआरडीएकडून करण्याची मंजुरी मिळाली आहे. या प्रसंगी त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आपल्या मतदार संघातील पुनर्वसनाची प्रक्रिया लवकर मार्गी लावण्याची विनंती त्यावेळी केली. त्यामुळे या नवीन होणाऱ्या रेल्वे मार्गामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील ४०% भार कमी होणार आहे. कर्जत, बदलापूर, कल्याण येथील प्रवाशांना थेट नवी मुंबईकडे जाता येणार आहे. त्यामुळे या महत्वकांक्षी प्रकल्पाला गती देण्याची विनंती रेल्वे मंत्र्यांना केली.
ठाणे रेल्वेस्थानकाला ऐतिहासिक दर्जा देऊन ठाणे रेल्वे स्थानकातील धोकादायक झालेल्या इमारतीसाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. तसेच कोपरी पूर्व सॅटीसच्या सुरू असलेल्या कामांमध्ये येणाऱ्या आराखड्यास तत्काळ मंजुरी देऊन या कामाला गती द्या तसेच रेल्वे रुळालगत जमिनीवर असलेल्या झोपड्या गेले ५० वर्षापासून तेथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या पुनर्वसनाचे धोरण लवकरात लवकर निश्चित करून त्यांना न्याय मिळवून द्या अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली.