मलंगगडावर पहिल्यांदाच पोहोचणार पाणी
ठाणे : कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या हाजी मलंगवाडी येथील पाणीपुरवठा योजनेला राज्य शासनाने मंजुरी दिली असून जल जीवन मिशनच्या माध्यमातून सहा कोटी १३ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. यासोबतच या कामाच्या निविदाही जाहीर करण्यात आल्या आहेत.
मलंगगडावर यापूर्वी कधीही पाणी पुरवठा योजनानव्हती. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने लवकरच मलंगगडाला स्वतंत्र आणि स्वतःची अशी पाणी पुरवठा योजना मिळणार आहे. या योजनेत पाणी उचल यंत्रणा, जलकुंभ, वितरण व्यवस्थेतील जलवाहिन्या, बंधारे आणि एमआयडीसीचे पाणी याचा समावेश करण्यात असेल. मलंगगडासोबतच आसपासच्या गावांनाही यामुळे पहिल्यांदाच पाणी पुरवठा योजना मिळणार आहे.
जिल्ह्यातील एक धार्मिक आणि पर्यटनस्थळ म्हणून ओळख अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडालाओळखले जाते. मात्र येथे यापूर्वी पाण्याची कोणतीही सुविधा नव्हती. खासदार डॉ. शिंदे यांनी मलंगगडावर स्वतः स्वतंत्र पाणी पुरवठा योजना उभारण्याची संकल्पना जिल्हा परिषेदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांच्याकडे मांडली होती. या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यासाठी भाऊसाहेब दांगडे यांनी तत्काळ मलंगगड भागात भेट दिली होती. त्याबाबतचा सविस्तर प्रकल्प अहवाल जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तयार करण्यात आला होता. यात उसाटणे येथून जाणाऱ्या एमआयडीसीच्या जलवाहिनीतून चार किलोमीटरवर या ठिकाणी पाणी नेण्याचा प्रस्ताव आहे. पाणी उचलून पंपाद्वारे गडावर उभारल्या जाणाऱ्या जलकुंभात नेले जाईल. तेथून जलवाहिन्यांच्या माध्यमातून ते पाणी घराघरात पोहोचवले जाणार आहे. या नळ पाणी योजनेचा समावेश जलजीवन योजनेत करण्यात आला.
या योजनेचा खर्च अधिक असल्याने हा प्रस्ताव मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने राज्य शासनाच्या पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली असून अंबरनाथ तालुक्यातील हाजी मलंगवाडी येथील पाणीपुरवठा योजनेसाठी सहा कोटी 13 लाख 6,984 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेमुळे पहिल्यांदाच मलंगगडावर पाणी पोहोचणार आहे. या कामाच्या निविदाही नुकत्याच जाहीर करण्यात आल्या असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खा.शिंदे यांनी दिली आहे.
मलंगगडावर पाणी पोहोचवण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. त्यामुळे त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. मलंगगड येथील पाणी पुरवठा योजना मार्गी लागत असताना अंबरनाथ आणि कल्याण तालुक्यातील गावांमधील पाणी योजनाही येत्या काळात मार्गी लावल्या जाणार आहेत, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे.