बेलापूर ते भाऊचा धक्का जलवाहतूक सेवा आजपासून सुरु

नवी मुंबईकरांना सुखद धक्का

ठाणे : उद्यापासून बेलापूर ते भाऊचा धक्का जलवाहतूक सेवा सुरु होणार आहे. याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तसेच बेलापूर टॅक्सी सेवेचे ध्वजांकन जलवाहतूक केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याहस्ते उद्या बेलापूर जेट्टी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे, मत्स्य व्यवसाय विभागाचे मंत्री अस्लम शेख, व राज्य मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे.

खासदार राजन विचारे यांच्या पाठपुराव्याने नवी मुंबईतील बेलापूर जेट्टीचे काम मार्गी लावण्यात त्यांना यश आले असून महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डामार्फत केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने सेक्टर १५, सीबीडी बेलापूर येथे जेट्टीचे सन २०१८ साली केंद्र शासनाच्या सागरमाला योजनेंतर्गत मंजुरी मिळवून काम सुरु केले होते. परंतु या कामामध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. जानेवारी २०१९ ला पर्यावरण खात्याची मान्यता मिळाल्यानंतर या जेट्टीच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

या जेट्टीच्या बांधकामासाठी केंद्रशासन ५० टक्के व राज्य शासन ५० टक्के असे एकूण ८.३७ कोटी खर्च करण्यात आलेले आहे. सदर जेट्टी ही एल टाईपमध्ये आहे. त्याची लांबी ७१X१० पाण्यात उतरणारी जेट्टी ही ५५X१० अशी असणार आहे. तसेच या ठिकाणी पार्किंग सुविधा ही उपलब्ध करण्यात आलेली आहे. या जेट्टीमुळे नवी मुंबईत येणाऱ्या पर्यटकांसाठी पॅसेंजर बोट व वॉटर टॅक्सी ची सेवा देण्यात येणार आहे. बेलापूर येथून प्रत्येकी १० ते ३० प्रवासी क्षमता असलेल्या ७ स्पीड बोटी आणि ५६ प्रवासी क्षमता असलेली कॅटामरान बोट अशा एकूण आठ बोटीद्वारे वॉटर टॅक्सी सेवा सुरु करण्यात येणार आहे. बेलापूर ते भाऊचा धक्का येथे पोहोचण्यास ३० मिनिट व कॅटामरान बोटने ४५ ते ५० मिनिट इतका कालावधी लागणार आहे. स्पीड बोट प्रति प्रवाशी भाडे ८०० ते १२०० रुपये पर्यंत असणार आहे. आणि कॅटामरान बोटी करिता प्रति प्रवाशी २९० इतके भाडे आकारण्यात येणार आहे.

बेलापूर येथून भाऊच्या धक्क्याबरोबर एलिफंटा व जेएनपीटी या मार्गावर सुद्धा जलवाहतूक सेवा सुरु राहणार आहे. या जलवाहतूक मार्गामुळे नवी मुंबई मध्ये येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढणार आहे. तसेच नवी मुंबईमध्ये होणाऱ्या नवीन विमानतळासाठी जोडणी मिळणार आहे.