करोनाविषयक लसीकरण प्रक्रिया पूर्ण करीत राफेल नदालचा सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅमचा विक्रम मोडीत काढण्यापेक्षा फ्रेंच आणि विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धामधून माघार घेईन, असे मत नोव्हाक जोकोव्हिचने व्यक्त केले आहे.
जागतिक टेनिस क्रमवारीत अग्रस्थानावर असलेल्या जोकोव्हिचला लसीकरण न झाल्यामुळे ऑस्ट्रेलियन स्पर्धेला मुकावे लागले. ‘‘माझे अद्यापही लसीकरण झालेले नाही. मात्र माझ्या मतावर ठाम राहण्यासाठी जेतेपदे गमवावी लागली तरी चालतील,’’ असे जोकोव्हिचने ‘बीबीसी’वर मंगळवारी प्रसारित झालेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
‘‘माझा लसीकरणाला विरोध नाही, तसेच लसीकरण विरोधातील अभियानापासूनही स्वत:ला दूर ठेवत आहे. परंतु प्रत्येकाला स्वत:साठी योग्य पर्याय निवडण्याचा अधिकार आहे. मला मिळालेल्या सर्व माहितीआधारे लस न स्वीकारण्याचा निर्णय मी सध्या तरी घेतला आहे. लसीकरण न झाल्यास मला बऱ्याच स्पर्धासाठी प्रवास करता येणार नाही, याची मला पूर्ण कल्पना आहे,’’ असे जोकोव्हिचने सांगितले.